रिलायन्स जिओने बाजारात मोफत इंटरनेटची सुविधा आणल्यापासून टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. जिओ पाठोपाठ एअरटेलनेही आपले विविध प्लॅन्स जाहीर केले. त्यानंतर आता व्होडाफोननेही आपल्या ग्राहकांसाठी अतिशय आकर्षक असा प्लॅन जाहीर केला आहे. ग्राहकांसाठी हा आकर्षक प्लॅन लवकरच बाजारात येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

जिओ आणि एअरटेलने आपल्या पोस्टपेड यूजर्सला मोफत डेटा ऑफर दिली आहे. त्यामुळे आता या कंपन्यांशी स्पर्धा असणाऱ्या व्होडाफोननेही अशाच एका ऑफरची घोषणा केली. व्होडाफोन आपल्या पोस्टपेड यूजर्सना ६० जीबी डेटा मोफत देणार आहे. ही ऑफर सर्व ‘व्होडाफोन रेड’ यूजर्ससाठी असेल असे कंपनीने सांगितले आहे. या ऑफरमध्ये यूजर्सना सहा महिन्यांसाठी प्रत्येकी १० जीबी असा एकूण ६० जीबी डेटा मोफत मिळेल. व्होडाफोन रेड प्लॅन ४९९ रुपयांपासून सुरु होतो. ज्यामध्ये मोफत डेटाशिवाय आणखी ५ जीबी डेटा दिला जाणार आहे. त्यामुळे व्होडाफोनच्या ग्राहकांसाठी ही अतिशय आनंदाची बाब म्हणावी लागेल.

रिलायन्स जिओकडून बाजारात आल्यापासून यूजर्ससाठी स्वस्त डेटा आणि फ्री कॉलिंग असे नवे प्लॅन आणले गेले. त्यामुळेच इतर कंपन्यांनीही आपल्या पोस्टपेड यूजर्ससाठीही स्वस्त प्लॅन आणले आहेत. देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखला जाणाऱ्या व्होडाफोनतर्फे जुलैमध्ये ग्राहकांना फोरजीचा ७० जीबीचा डेटा प्लॅन देण्यात आला होता. हा प्लॅन केवळ २४४ रुपयांना असून ७० दिवस प्रत्येक दिवशी १ जीबी इतका डेटा ग्राहक वापरु शकणार होते. हाय-स्पीड डेटाबरोबरच अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा देण्यात आली होती.