स्वाइन फ्लूने यंदाच्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात देशभरात ६०० बळी घेतले असून १२ हजार ४६० जणांना लागण झाली होती. गेल्या वर्षी संपूर्ण वर्षांत २६५ जण मरण पावले होते, तर १७८६ जणांना लागण झाली होती. तज्ज्ञांच्या मते हा रोग आता प्रौढांमध्ये दिसू लागला असून ४० टक्के मृत्यू व ५० टक्के संसर्ग २० ते ५० वयोगटातील व्यक्तींना झाला आहे. महाराष्ट्रात यंदा आतापर्यंत २८४ मृत्यू झाले असून २३२४ जणांना लागण झाली आहे. स्वाइन फ्लूमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती एक ते दोन वर्ष टिकते. गेल्या दोन आठवडय़ात मुंबईच्या पश्चिम उपनगरात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले आहेत.  पुण्यात आतापर्यंत ६४ बळी गेले आहेत. २००९ मध्ये स्वाइन फ्लूचा प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला होता. त्यावेळी संसर्ग झालेल्या रुग्णांना वेगळे काढण्याची वेळ आली होती. त्यावेळी हा विषाणू भारताला नवीन असताना २७०० लोक मरण पावले, तर ५० हजार लोकांना लागण झाली होती. स्वाइन फ्लू विषाणूत उत्परिवर्तन झाल्याची शक्यता पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने फेटाळली आहे. स्वाइन फ्लूच्या एच१ एन१ विषाणूच्या नव्या प्रजातीचा प्रसार झाल्याचे काहींचे म्हणणे असून अमेरिकेच्या संसर्गजन्य रोग नियंत्रण केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या विषाणूत काही जनुकीय बदल झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विषाणूंमध्ये जनुकीय बदल होत असतात व त्यांचा प्रसार वाढत असतो. सर गंगाराम रुग्णालयाचे डॉ. चंद वट्टल यांनी सांगितले की, जनुकीय बदलांचा मुद्दा नाही. या विषाणूत जनुकीय उत्परिवर्तन झाल्याचे दिसून आलेले नाही.