उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये अनेकजण सहलीचं नियोजन करतात. भटकंती करताना काही खबरदारी घेणं गरजेचं असतं, नेमकं त्याबाबतच आपल्याकडे बरीच अनभिज्ञता दिसून येते. प्रवासाचा पुरेपूर आनंद लुटायचा तर अर्थातच आपले आरोग्य चांगले राहायला हवे. त्यासाठी प्रवासाची तयारी करताना तसेच प्रवासांमध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कितीही उन्हाळा असला तरी महत्त्वाची कामे करावीच लागतात. जर तुम्ही उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करताय अथवा जात असाल तर प्रवासादरम्यान काय काळजी घ्यावी यासंदर्भात आम्ही आज माहिती देत आहोत.

सनस्क्रीनचा वापर –
उन्हामध्ये भटकंती करताना सनस्क्रीनचा वापर करायला विसरू नका. ज्या सनस्क्रीनमध्ये एसपीएफचे प्रमाण २० पर्यंत असते, असा सनक्रिन किंवा अशा स्वरूपाचा मॉइश्चरायझर उपलब्ध झाल्यास आवर्जून वापरावा. दर दोन तासांला सनस्क्रीन लावा जेणेकरून उन्हापासून त्वचेचं रक्षण होईल.

भरपूर पाणी प्या –
उन्हाळ्यातील सर्वात मोठा धोका म्हणजे शरीराचे निर्जलीकरण अर्थात डिहायड्रेशन! दिवसभरात कमीतकमी ८ ते १० ग्लास पाणी पिल्यास डिहाड्रेशनचा धोका टाळता येईल. प्रत्येक तासाला जास्तीत जास्त पाणी प्यावे. त्याशिवाय लिंबू शरबताचे सेवनही करावे. प्रवासादरम्यान बॅगमध्ये पाण्याची बाटली ठेवाच, कारण गळा कोरडा पडल्यास किंवा अस्वस्थ झाल्यास कामाला येईल.

छत्रीला तुमचा मित्र बनवा –
कडाक्याच्या उन्हापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी छत्री तुमच्याकडे असायलाच हवी. छत्रीलाच तुमचे मित्र करा. बाहेर निघताना छत्री बॅगमध्ये असल्याची खात्री करा.

प्रवासाचे नियोजन करा –
भटकंतीला जात असाल तेव्हा कडाक्याच्या उन्हामध्ये दुपारी शक्यतो बाहेर पडणे टाळा. सकाळी अथवा संध्यकाळच्या वेळी उन्ह कमी असताना फिरायचे नियजोन करा. त्यामुळे फिरायला जायचे नियजोन एकदिवस आधीच करा.

जेवणाची काळजी घ्या –
तुम्ही प्रवासात असाल तर साधे जेवण घ्या. शक्यतो शाकाहारी जेवणावर भर द्या. खाताना संयम पाळा. चार घास कमी खा. ‘अपचन’ हा सहलीच्या काळातील अविभाज्य भाग होऊ देऊ नका.

प्रथमोपचार पेटी सोबत बाळगा –
प्रवासादरम्यान लागणारी औषधं सोबत ठेवावीत. बहुधा ज्याला आपण ‘फर्स्ट एड बॉक्स’ म्हणतो, तो लांब पल्ल्याचा प्रवासाचा सोबती असायलाच हवा. त्यात औषधांचा पुरेसा साठा असावा. साधारणत: जुलाब थांबवण्याची, ताप, डोकेदुखी, वांत्या, पोटदुखी, ऍलर्जी बंद करण्याची औषधं या पेटीत असावीत. दुखलं खुपलं तर वेदनाशामक गोळया, लावायची मलमं, जखमांना करायची मलमपट्टीची साधनं असू द्यावीत.

रोड ट्रीप टाळा –
उन्हाळ्यामध्ये रोड ट्रीप टाळाच. ज्या ठिकाणी जात असाल तिथे बस अथवा विमानाने जा अथवा चारचाकी गाडीनं गेलात तर उत्तमच.