डॉक्टर, परिचारिकांची संख्या वाढवण्याची गरज
नवजात बालकांचा मृत्यू ही आग्नेय आशियातील सर्वात मोठी आरोग्यविषयक समस्या आहे. आग्नेय आशियात दररोज ७४०० नवजात बालकांचा मृत्यू होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
नवजात बालकांपैकी दोनतृतीयांश मृत्यू हे टाळता येऊ शकतात आणि त्यासाठी किफायतशीर उपाययोजना करता येतील, पण त्यासाठी संबंधित देशातील सरकारांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. आग्नेय आशिया विभागात भारतासह बांगलादेश, भूतान, कोरिया, इंडोनेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि तिमोर लेस्ट या देशांचा समावेश होतो. या विभागाच्या प्रादेशिक संचालिका डॉ. पूनम खेतरपाल सिंह यांनी सांगितले की, मातांची योग्य ती काळजी घेतली तर या नवजात अर्भकांचे प्राण वाचू शकतात. बाळंतपणाच्या वेळी निर्माण होत असलेल्या गुंतागुंतीच्या समस्यांनी नवजात बालकांचे मृत्यू होता.
जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, यूएनएफ पीए, जागतिक बँक, यूएनएआयडीएस, यूएन विमेन या संघटनांनी नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे ठरवले आहे. या देशांनी माता व नवजात बालकांच्या मृत्यूचा आढावा घेणे गरजेचे आहे. आरोग्य कर्मचारी म्हणजे डॉक्टर्स, परिचारिका, दाया यांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे, त्यांचे प्रमाण या देशात कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते १० हजार लोकसंख्येमागे २३ आरोग्य कर्मचारी गरजेचे असतात.पाच वर्षांच्या खालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. २०१५ च्या आकडेवारीनुसार हे प्रमाण हजारात ४३ आहे ते १९९० मध्ये हजारात ११८ होते. म्हणजे पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण ६४ टक्क्यांनी कमी झाले आहे.