टेलिकॉम सेक्टरमध्ये धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओने आता नोकरी शोधणा-यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ८० हजार जणांची भरती करणार आहे. नव्या लोकांच्या भरतीसाठी सोशल मीडियाचाही वापर केला जाणार आहे.

रिलायन्स जिओचे मुख्य मानव संसाधन अधिकारी(Chief human resources officer) संजय जोग यांनी एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली. जिओ यावर्षी ७५ हजार ते ८० हजार नव्या नोक-या उपलब्ध करेल असं ते म्हणाले. आधीपासूनच कंपनीत १.५७ लाख लोकं नोकरी करत असून यावर्षी आम्ही आणखी भरती करणार आहोत अशी माहिती जोग यांनी दिली.

रिलायन्स जिओने ६ हजारांपेक्षा जास्त महाविद्यालयांसोबत भागीदारी केली आहे. यामध्ये देशातील अनेक टेक्निकल इंन्स्टिट्यूट्सचा समावेश आहे. येथे शिकणा-यांसाठी नोकरी मिळण्याची सोपी संधी असेल, याशिवाय सोशल मीडियाचाही भरतीमध्ये वापर केला जाणार आहे असं जोग म्हणाले.

कसा करायचा अर्ज –
अद्याप या भरतीला सुरूवात झालेली नाही , त्यामुळे भरतीसाठी अर्ज कसा करायचा याची नेमकी माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, भरतीला सुरूवात झाल्यावर रिलायन्स जिओच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.jio.com ) गेल्यास careers या पर्यायावर क्लिक करावं लागेल. संकेतस्थळावर खालच्या बाजूला हा पर्याय आहे. त्याठिकाणी नोकरीबाबत सर्व माहिती उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.