डेंग्यू या विकाराचा सर्वाधिक धोका असल्याने जगभरात दरवर्षी या रोगाच्या निवारणासाठी तब्बल ८९० कोटी डॉलर खर्च केला जात आहे, अशी माहिती अमेरिकी शास्त्रज्ञांनी दिली. भारतासह अनेक विकसनशील देशांमध्ये डेंग्यू या विकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने हा खर्च वाढत आहे. कॉलरा, कॅनी रेबिज, रोटाव्हायरस या विकारांपेक्षा डेंग्यूवर सर्वाधिक खर्च केला जात आहे, अशी माहिती या शास्त्रज्ञांनी दिली.

अमेरिकेतील ब्रँडीज विद्यापीठाच्या आरोग्यतज्ज्ञांनी ‘आरोग्यावरील आर्थिक भार’ या विषयावर संशोधन केले. त्यासाठी त्यांनी १४१ देशांमधील आरोग्यविषयक समस्यांचा आणि विविध विकारांवर केला जाणारा खर्च याचा आढावा घेतला. त्यामध्ये डेंग्यू या विकारावर सर्वाधिक खर्च केला जात असल्याचे या आरोग्यतज्ज्ञांना आढळले. कॉलरा, रोटाव्हायरस, कॅनी रेबिज, चॅग्ज डिसीज आदी विकारांवर याआधी अधिक खर्च केला जात असे. मात्र डेंग्यूने या विकारांनाही मागे टाकले आहे. डासांनी चावल्यामुळे होणाऱ्या डेंग्यू या रोगाचा विळखा वाढलेला असून दरवर्षी ६ ते १० कोटी रुग्ण या विकाराचे आढळतात, असे डोनाल्ड शेपर्ड यांनी सांगितले. शेपर्ड हे या संशोधक गटाचे नेतृत्व करत आहेत.

भारत, ब्राझिल, इंडोनेशिया या विकसनशील देशांमध्ये वाढत्या नागरिकरणामुळे हा विकारही मोठय़ा प्रमाणात प्रसारित होत आहे. या विकाराने सार्वजनिक आरोग्य बिघडत असून आरोग्यविषयक खर्चही वाढत आहे. या गंभीर आजारात जर विशेष काळजी घेतली नाही, तर प्रसंगी मृत्यूला सामोरे जावे लागते, असे शेपर्ड म्हणाले.

भारत, मलेशिया, मेक्सिको आणि फिलिपाइन्स हे देश डेंग्यूच्या निवारणासाठी सर्वाधिक खर्च करत आहेत, असेही शेपर्ड यांनी सांगितले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)