उन्हाळ्याच्या सुट्ट्या ऐन भरात येईल तसतशी अनेक कुटुंब आपल्या मुलांबरोबर भटकंतीसाठी बाहेर पडतील आणि कुटुंब सहलींना भर येईल. मुलांना घेऊन केलेला अमेरिकेचा दौरा एकाच वेळी मौजमजेचा आणि शैक्षणिकही ठरू शकतो. येथे दिलेल्या विचारांना चालना देणा-या, मुलांची मने गुंतवून ठेवणा-या, काहीतरी नवे शिकविणा-या नऊ ठिकाणांमध्ये त्यांना शिक्षण प्रत्यक्ष साकारत असल्याचा अनुभव येईल.

१. MoPOP, सिएटल, वॉशिंग्टन
द म्युझियम ऑफ पॉप कल्चर किंवा MoPOP म्हणजे ”नव्या काळाचे प्रतिनिधीत्व करणारे, ना-नफा तत्त्वावर चालणारे आणि समकालीन पॉप्युलर कल्चरला चालना देणा-या कल्पना आणि धाडसांना समर्पित म्युझियम” आहे, असे याचे अधिकृत वर्णन केले जाते. सुरुवातीच्या काळात एक्स्पिरियन्स म्युझिक प्रोजेक्ट नावाने ओळखल्या जाणा-या या म्युझियमची स्थापना मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांनी केली, तर आर्किटेक्ट फ्रँक ओ. गेहरी यांनी इलेक्ट्रिक गिटार्सचे तुकडे वापरून त्याचे सुरुवातीचे मॉडेल तयार केले.
या संग्रहालयात ठेवलेल्या वस्तूंमध्ये आर्ट ऑफ फॅण्टसी, हॉरर सिनेमा, व्हिडिओ गेम्स, सायन्स फिक्शन गटातील साहित्य आणि पेहराव अशा गोष्टींचा समावेश आहे. इथे सिएटलचे संगीतकार निर्वाना आणि जिमी हेन्ड्रीक्स यांचे संगीत व त्यांच्या ऐतिहासिक कारकिर्दीची साक्ष सांगणा-या दुर्मिळ कलाकृती, या कलाकारांनी आपल्या हस्ताक्षरात लिहिलेल्या गाण्यांच्या ओळी, त्यांची खासगी वाद्यं आणि ओरिजिनल फोटोग्राफ्स अशा अनेक गोष्टींचा संग्रह आहे. आजच्या काळातील अनेक मुलांना या संगीतकारांची माहिती नसते.

२. ब्रायटन बीच, ब्रुकलीन, न्यू यॉर्क

तुम्ही तुमचा दिवस किना-याशी हितगुज करणा-या लाटांशी खेळण्यात किंवा अकॉर्डिन प्लेअर्स आणि गिटारिस्ट्सच्या सुरावटी ऐकण्यात घालवू शकता. या कलाकारांच्या वाद्यांतून ओळखीच्या गाण्यांची धून निघाली की, अवतीभोवतीची गर्दी पाहता-पाहता भारून जाते आणि त्यांच्या सुरांत सूर मिसळून गाऊ लागते. ब्रॉडवॉकपासून थोड्यात अंतरावर असलेला ब्रायटन बीच एव्हेन्यू हा रस्ता इलेव्हेटेड ट्रेनखालच्या जागेत वसला आहे. डोक्यावरून सतत धडधडत जाणारी ट्रेन या जागेला तिचे अनोखे वैशिष्ट्य देऊन जाते. हा संपूर्ण रस्ता रंगबिरंगी फळांचे स्टॅण्ड्स आणि चटकदार पदार्थ व परदेशी चॉकलेटांच्या स्टॉल्सनी सतत बहरलेला असतो.

३. न्यू ऑरलीन्स एअरलिफ्ट प्रोजेक्ट, न्यू ऑरलीन्स, लुईझियाना
”विस्मय आणि कुतुहलाची भावना जागी करावी, विविध संस्कृती व समाज एकमेकांशी जोडले जावेत आणि प्रायोगिक सार्वजनिक कलेच्या निर्मितीमधून नव्या संधीं तयार केल्या जाव्यात” हे ध्येय घेऊन कलाकारांचा हा मेळा उभारला गेला आहे. एखाद्या वाद्याप्रमाणे वाजवता येईल असे घर बनवता येईल का, ही कल्पना घेऊन सुरू झालेला हा प्रकल्प इथल्या सांगितिक आणि वास्तूकलेशी संबंधित प्रयोगांसाठी ओळखला जातो.

४. मिल्येनियम पार्क, शिकागो, इलिनॉइस
शिकागोची अद्वितीय स्कायलाइन नजरेत सामावून घेत, कारंज्यांशी खेळत, उद्यानांची सैर करत इथला दिवस घालवता येईल. ‘क्लाउड गेट’ नावाच्या बीनच्या आकाराच्या चांदीच्या विराट शिल्पाबरोबर सेल्फी घ्या किंवा फ्रँक ओ. गेहरी यांनी डिझाइन केलेल्या जे प्रित्झकर पॅव्हेलियॉनमध्ये संगीतमैफिलीची आस्वाद घ्या.

५. पॅसिफिक कोस्ट हायवे, कॅलिफोर्निया
मुलांना खुल्या, विस्तीर्ण रस्ताचे सौंदर्य काय असते याची ओळख करून द्या. एखादी कॅम्पर व्हॅन किंवा आरव्ही भाड्याने घेऊन पॅसिफिक किना-याला लागून चाललेल्या रस्त्यावरून एकत्र प्रवास करा. आपल्या सवडीने आणि गतीने पुढे जा, खूप सारे थांबे घ्या. व्हेल्स व सूर्यास्ताचे सौंदर्य निरखा आणि पॅसिफिक समुद्रापासून पाऊलभर अंथरावर रात्रीची पथारी टाका.

६. हॉन्क! केंब्रिज, मॅसेच्युसेट्समधला चळवळ्या स्ट्रीट बॅण्ड्सचा उत्सव
राजकीय संचलन करत जाणारे स्ट्रीट बॅण्ड्स, जिथे आपल्या वाद्यांनी रस्ते दणाणून सोडतात, तो तीन दिवसांचा संगीत महोत्सव म्हणजे हॉन्क! या संगीताच्या तालावर नाचण्याचा मोह ना मुलांना आवरेल ना तुम्हाला.

७. इंटरनॅशनल फोल्क-आर्ट मार्केट, सॅन्टा फे, न्यू मेक्सिको
२००४ पासून भरणा-या या बाजारामध्ये आजवर जगभरातील ९१ देशांच्या ७५० कलाकारांनी भाग घेतला आहे. कसबी कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतींचे हे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन मानले जाते. या बाजारपेठेत सहभागी होणारे कलाकार आपल्या वस्तूंच्या विक्रीतून मिळणा-या कमाईतील ९० टक्के भाग आपल्या स्थानिक समाजातच गुंतवतात.

८. नॉर्दन लाइट्स
यूएसएमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथून तुम्हाला जादुई नॉर्दन लाइट्सचे दर्शन घडू शकते. पानगळीच्या मोसमात आकाशाचा रंग गडद होतो आणि हवेत काहीसा उबदारपणा अजूनही शिल्लक असतो. असे दिवस म्हणजे नॉर्दन लाइट्स पाहण्यासाठीची सर्वात चांगली संधी असते. आयडाहो, मिशिगन, मेन, मिनेसोटा, अलास्का ही ऑरोरा बोरेलिसची अर्थात नॉर्दन लाइट्सची जादू अनुभवण्यासाठीची सर्वात चांगली ठिकाणं आहेत.

९. मेसा व्हर्दे नॅशनल पार्क, कोलोरॅडो
७०० हून अधिक वर्षांपासून अमेरिकेतील मूळ रहिवासी, अँन्सेस्ट्रल प्युब्लोन्स व त्यांच्या वंशजांची वस्ती इथे वसली आणि भरभराटीला आली. मेसा व्हर्दे नॅशनल पार्कमध्ये ठिकठिकाणी ४,०००हून अधिक पुरातन स्थापत्यकलेचे नमुने पेरलेले आहेत. मेसा पर्वताच्या माथ्यावर जवळ-जवळ ६०० वर्षे वस्ती केल्यानंतर या संस्कृतीमधील मानवांनी पर्वतकड्यांमध्ये घरे आणि वास्तू बांधायला सुरुवात केली. या वास्तूंचे आजही शाबूत असलेले अवशेष म्हणजे या राष्ट्रीय उद्यानाचे प्रमुख आकर्षण आहे.