आधार क्रमांक सर्व आर्थिक व्यवहारांशी संलग्न करावे असे आदेश मोदी सरकारने दिले आणि त्याची अंमलबजावणीही वेगाने सुरु झाली. मात्र सर्व व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी करण्यात आलेल्या या योजनेत त्रुटी असल्याची शक्यता अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे. यावर सरकारने मार्ग शोधून काढला असून आधार कार्डवरील सर्व माहिती सुरक्षित रहावी यासाठी विशेष यंत्रणा करण्यात आली आहे.

प्रत्येक आधार धारकाला स्वतःच बायोमेट्रिक लॉक लावून आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवता येणार आहे. विशेष ओळख क्रमांक प्राधिकरणाकडून (यूआयडीएआय) ही सुविधा देण्यात आली असून त्यामुळे नागरिकांची वैयक्तिक माहिती लिक होण्यापासून बचाव होणार आहे. सध्या दरदिवशी किमान १५०० नागरिकांची ‘आधार’साठी माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत चार कोटी ‘आधार’ क्रमांक दिले गेले आहेत. सुरक्षिततेच्यादृष्टीने सुरुवातीपासूनच बायोमेट्रिक लॉकचा पर्याय उपलब्ध करुन दिला होता. मात्र त्याबाबत फारशी चर्चा न झाल्याने ते सामान्यांपर्यंत पोहचण्यास उशीर होत आहे असे यूआयडीएआयचे म्हणणे आहे. आपली वैयक्तिक माहिती चोरली जाऊन त्याव्दारे गैरव्यावहार होऊ शकतात अशी भिती वाटणाऱ्या नागरिकांसाठी ही अतिशय सकारात्मक बाब आहे.

या आहेत महत्त्वाच्या पायऱ्य़ा…

– http://www.uidai.gov.in या वेबसाइटवर आधार सर्व्हीसेसमध्ये Lock/Unlock Biometrics असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा, मग वेगळे पेज ओपन होईल.

– या पानावर तुम्हाला तुमचा १२ आकडी आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाकावा लागेल.

– यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर वनटाइम पासवर्ड (ओटीपी) येईल.

– हा ओटीपी टाइप करून लॉगइन करा. लॉगइन झाल्यावर सिक्युरिटी कोड पुन्हा टाइप करा. यामुळे लॉक ऑन होईल. लॉक ऑन असताना तुम्ही बायोमेट्रिक पडताळणी करू शकणार नाही.

– लॉक ऑन झाल्यावर यूआयडीएआयच्या साइटवर तुमची बायोमेट्रिक माहिती लॉक झाली आहे, असा मेसेज तुम्हाला येईल.

– आधारचे हे लॉक उघडण्यासाठीही तुम्हाला एक प्रोसेस करावी लागेल. वरीलप्रमाणे सगळी प्रोसेस झाल्यावर Disable या बटनावर क्लिक करा.

– यामुळे बायोमेट्रिक लॉक उघडेल आणि तुमची बायोमेट्रिक माहिती तुम्हाला आधारसंलग्नतेसाठी वापरता येईल. या माहितीचा वापर झाल्यावर पुन्हा बायोमेट्रिक लॉक लावता येईल.