करोना विषाणूबद्दलची माहिती देणाऱ्या आरोग्य सेतू अ‍ॅपबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना हे अ‍ॅप फोनमध्ये डाऊनलोड करणे बंधनकारक असेल, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आरोग्य सेतू अ‍ॅप सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले होते. पण, आता सरकारने खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनाही हे अ‍ॅप बंधनकारक केले आहे. ‘१०० टक्के म्हणजे सर्व कर्मचार्‍यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असेल हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांच्या प्रमुखांची असेल’, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट केले आहे. आरोग्य सेतू हे अ‍ॅप करोना व्हायरसला रोखण्याच्या हेतूने डिझाइन केलेले आहे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे सर्व लोक त्यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करतील याची स्थानिक प्रशासनाने खात्री करावी, असेही गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

आरोग्य सेतू अ‍ॅप करोना व्हायरसच्या धोक्यापासून युजरला अलर्ट करतं. हे अ‍ॅप संपर्क ट्रेसिंगद्वारे आणि युजर्सच्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे त्याच्याभोवती करोना संक्रमित असेल तर त्याची माहिती देते. याशिवाय या साथीच्या आजाराशी संबंधित बरीच महत्वाची माहितीही दिली जाते. करोना संसर्गापासून बचाव आणि लक्षणांचीही माहिती मिळते. पंतप्रधान मोदींनीही एप्रिल महिन्यात मन की बात कार्यक्रमात आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड आणि वापर करण्याचं आवाहन केलं होतं. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.