सणांचे दिवस म्हणजे नखशिखांत सजण्याचं निमित्त. पण कपडे, ज्वेलरी यांच्या पसाऱ्यात दुर्लक्ष होते ते पायांकडे. मग आहे त्या ‘कलेक्शन’मधीलच एखादी चप्पल किंवा हिल्स घालून वेळ भागवली जाते. पण बाजारात पायांना सजवण्यासाठी आकर्षक ‘अ‍ॅक्सेसरीज’ आल्या आहेत. या ‘अ‍ॅक्सेसरीज’ परिधान केल्या की बघणाऱ्याचे लक्ष पहिल्यांदा पायाकडे गेले नाही तर नवलच!

नवरात्र, मग दसरा त्यानंतर येणारी दिवाळी हा महिना पूर्ण सणांनी गजबजलेला आहे. त्यामुळे खरेदीही जोरदार चालू आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ वेगवेगळ्या साडय़ा, पटियाला, घागरा मिरविल्याने कपडय़ांचा, ज्वेलरीचा स्टॉक संपतो. मग पुन्हा दिवाळीसाठी सगळी जमवाजमव सुरू होते. डिझायनर ड्रेससोबत कानात डूल, गळ्यात छान नेकपीस, हातात बांगडय़ा सगळं ओघाने येतंच. पण पायांचं काय? एक तास घ्या, नाही तर दोन तास सणांच्या दिवसांमध्ये फुरसतीत तयार होऊन बाहेर पडेपर्यंत उशीर होतोच. मग कधी तरी फॅशन स्ट्रीटवरून आणलेली जुती घालून तसंच बाहेर पडतो. ‘पायांकडे कोण बघतंय’ असा विचार करत चपलांचा फारसा विचारही केला जात नाही. कित्येकदा हाताच्या नखांना छानपकी नेलआर्ट करताना पायाच्या नखांचं जुनं नेलपेंट काढून नवं लावण्याची उसंतही मिळत नाही.

यंदाच्या फेस्टिव्ह सिझनमध्ये मात्र या पायांनाही थोडं मिरविण्याची संधी द्याच. त्यासाठी बाजारातही वेगवेगळ्या ‘लेग अ‍ॅक्सेसरीज’ आल्या आहेत. त्यांच्यावरही एकदा नजर फिरवायला हवी. आपल्याला पायाचे दागिने म्हणजे पंजणांचीच आठवण येते. पण त्याच्याही पलीकडे पायासाठी वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरीज बाजारात पाहायला मिळतात. अर्थात या ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरीज पायाच्या घोटय़ावर म्हणजेच अँक्लेटवरच घातल्या जातात. त्यामुळे काहीशा पंजणांशी साधम्र्य साधणाऱ्या, पण त्यांच्याहून काहीशा वेगळ्याही आहेत. तुमच्या फेस्टिव्ह लुकला युनिक टच देणाऱ्या तर नक्कीच आहेत.

थाय चेन

नेहमीचे सलवार सूट, साडीऐवजी हल्ली सणांच्या दिवसातही वन पीस ड्रेस सहज घातले जातात. या ड्रेसेससोबत जुळून येतील अशा थाय चेन सध्या बाजारात आल्या आहेत. यामध्ये वेगवेगळ्या चेन्स एकत्र जोडून साखळी तयार केलेली असते. नावाप्रमाणे या मांडीपासून या चेन सुरू होतात ते थेट अँकलपर्यंत जातात. वेगवेगळ्या उंचीमध्ये मिळणाऱ्या या चेन्स एरवीही शॉर्ट स्कर्ट, हॉट पँटसोबत वापरता येतात. यांच्या किमती ३०० रुपयांपासून सुरू होतात.

मेटालिक टॅटू

प्रत्येक वेळी पायांमध्ये अँक्लेट घालताच येईल असं नाही. ऑफिसला किंवा एखाद्या पार्टीमध्ये सतत वाजणारं अँक्लेट नकोसं वाटतं. अशा वेळी मेटालिक टॅटू अँक्लेटला पर्याय म्हणून वापरता येतात. गोल्ड, सिल्व्हर, मेटालिक व्हाइट, मेटालिक ब्ल्यू रंगामध्ये हे टॅटू उपलब्ध आहेत. पाण्याच्या मदतीने घरच्या घरी पाच मिनिटांत हे टॅटू लावता येतात. एक टॅटू दोन-तीन दिवस सहज वापरता येतो. साबणाने नीट धुतल्यास काढताही येतात. अगदी १०० रुपयांपासून हे टॅटू बाजारात उपलब्ध आहेत.

कुंदन पैंजण

घुंगरांचे सिल्व्हर किंवा गोल्ड फिनिशचे पैंजण एरवीही वापरले जातात. पण पैंजणांना ट्विस्ट द्यायचा असेल तर कुंदनचे पैंजण नक्कीच वापरून बघा. कुंदनसोबत लाल, हिरव्या रंगांच्या खडय़ांचा वापर यात केला जातो. गंमत म्हणजे हे पैंजण तुम्ही एखाद दिवशी ब्रेसलेट म्हणून हातातही घालू शकता. तसंच हातातलं एखादं ब्रेसलेट अशा प्रकारे अँक्लेट म्हणून वापरण्याचा प्रयोगही करता येऊ शकतो. साधारणपणे २०० रुपयांपासून या पैंजणांच्या किमती सुरू होतात.

बेअर फूट सँडल

मघाशी म्हटल्याप्रमाणे पायाच्या बऱ्याच अ‍ॅक्सेसरीज पंजणांशी जवळीक साधणाऱ्या असणं साहजिक आहे. बेअर फूट सँडल हा तसाच एक प्रकार. तुम्हाला हातात अंगठी आणि कडा यांना जोडणाऱ्या हातफुलांची संकल्पना माहीत असेलच. त्याच भाऊबंदकीतील पायाची ज्वेलरी म्हणजे बेअर फूट सँडल. यामध्ये पायातील अँक्लेट थेट पायाच्या मधल्या बोटाला जोडलं जातं. चेन, क्रोशो लेस, बिड्स, खडे, मोती यांचा वापर यात होतो. यांची मजा म्हणजे एखादा मजबूत धागा आणि छान मोती, खडय़ांच्या मदतीने तुम्ही ही ज्वेलरी घरच्या घरीही बनवू शकता. यूटय़ूबवर त्याचे टय़ुटोरीअल व्हिडीयो पाहता येतीलच. पण यांना बेअर फूट सँडल म्हणण्याचं कारण म्हणजे नावाप्रमाणे यांच्या जोडीला कोणत्याही फॅन्सी चपलेची गरज नसते. तुम्ही अगदी साधीशी चप्पल किंवा हिल्स घातली तरी ही ज्वेलरी त्यावर जुळून येते. तसंच सणांच्या दिवसात कोणाच्या घरी जायचं असेल, तर डिझायनर चप्पल त्यांच्या घराबाहेर ठेवावी लागते. पण अशा वेळी तुमचे पाय मोकळे राहणार नाही याची काळजी ही ज्वेलरी घेते. त्यामुळे नकळत ती सँडलचा भाग बनते. १५० ते ५०० रुपयांपर्यंत या सँडल उपलब्ध आहेत.

टोरिंग्स

हाताप्रमाणेच पायात घालायच्या अंगठय़ांमध्ये सध्या वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत. फुलपाखर, फ्लोरल डिझाइन, स्ट्राइप्स, भौमितिक आकार या डिझाइन्स आणि रंगीत खडय़ांचा वापर केलेल्या टोरिंग्स सध्या बाजारात आल्या आहेत. हाताप्रमाणेच एकाच वेळी दोन ते तीन बोटांमध्येही या िरग्स सहज घालता येतात. फक्त तुमच्या चपलेच्या अंगठय़ामध्ये त्या येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. नाहीतर त्या टोचू शकतात. ५० रुपयांपासून या अंगठय़ा बाजारात उपलब्ध आहेत.

कुठे मिळतील?

गावदेवी मार्केट, राम मारुती रोड, कोरम मॉल, विविआना मॉल येथे या अ‍ॅक्सेसरीज उपलब्ध आहेत.

किंमत- १५० रु. ते १५०० रु.