16 October 2019

News Flash

अमेरिकन गिरवणार अच्युत पालवांच्या देवनागरी सुलेखनाचा कित्ता

आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी प्रदर्शनात भारतीय सुलेखनकार अच्युत पालव यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

अच्युत पालव

६ व्या कॅलिग्राफीज इन कॉन्वर्सेशन, सॅन फ्रान्सिस्को येथे भरणा-या आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी प्रदर्शनात भारतीय सुलेखनकार अच्युत पालव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या शहरात ७ जून रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून जगातील मान्यवर सुलेखनकारांचे काम या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभाच्या दिवशी अच्युत पालव यांचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. जगातील निवडक चित्रांची ‘मास्टर्स’ विभागात मांडणी करण्यात आली आहे. १२ जून रोजी अच्युत पालव यांचा मास्टर क्लास आयोजित करण्यात आला असून भारतीय सुलेखनाच्या विविध शैली आपल्या कुंचल्यातून सादर करणार आहेत. या वर्गात अमेरिकन कॅलिग्राफर देवनागरी लिपीकडे कशा पद्धतीने बघत आहेत तसेच कशा पद्धतीने लिहिणार आहेत हा एक कुतूहलाचा विषय असणार आहे.

अमेरिकेबरोबरच सप्टेंबरमध्ये कोरिया येथे भरणा-या ११व्या वल्र्ड कॅलिग्राफी (बिनाले) प्रदर्शनातसुद्धा अच्युत पालव यांच्या मराठमोळ्या अक्षराने नटलेल्या, सजलेल्या अक्षरचित्रांची निवड झाली आहे. सातत्याने मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन सुलेखनात नवनवीन प्रयोग करणाऱ्या पालवांनी यंदा अमेरिकेत संत तुकारामांच्या ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या ओवीचा वापर करून अक्षररचना केली आहे, तर कोरियात वसुधैव कुटंबकम आणि ज्योतिने तेजाची आरती या सुभाषितांचा वापर करून रचना केल्या आहेत.

मराठी भाषा व सुलेखन कला जगात पोहोचली पाहिजे हा दृष्टीकोन जगासमोर ठेऊन अच्युत पालव सतत वेगवेगळे प्रयोग करत असतात. दोन वर्षांपूर्वी पॅरिस येथे जगातल्या ६ कॅलिग्राफर्समध्ये अच्युत पालव यांच्या कामाची निवड झाली तेव्हा पालवांनी पॅरिसच्या भिंतींवर संत ज्ञानदेव, संत तुकाराम, मंगेश पाडगांवकर, बहिणाबाई, ना.धों. महानोर आणि इतर नामवंत कवींच्या रचनांचा वापर करून ‘गर्जते मराठी’ हे जगाला दाखवून दिले होते. सॅन फ्रान्सिस्कोच्या प्रदर्शनात पालवांबरोबर त्यांच्या काही विद्यार्थ्यांचेही काम डिजीटल विभागात दाखविले जाणार आहे. जगभर मराठी सुलेखन कला आता दिसू लागली आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

First Published on May 16, 2019 8:00 pm

Web Title: achyut palav invited for international calligraphy exhibition in san francisco