‘फ्लू’मुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका सहापटीने वाढत असून सुरुवातीच्या सात दिवसांत तो उद्भवण्याची शक्यता अधिक असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

‘फ्लू’ (इंफ्लुएन्झा, विषाणूंचा संसर्ग) झाल्यानंतर पहिल्या सात दिवसांत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो, असे कॅनडातील इन्स्टिटय़ूट फॉर क्लिनिकल इव्हॅल्युएटिव्ह सायन्स (आयसीईएस) अ‍ॅण्ड पब्लिक हेल्थ ऑन्टॅरिओ (पीएचओ) येथील संशोधकांनी स्पष्ट केले. आम्ही केलेले संशोधन महत्त्वाचे असून फ्लू झाल्यानंतर तातडीने लसीकरण करून घेणे आवश्यक ठरते, असे ‘आयसीईएस’ आणि ‘पीएचओ’चे शास्त्रज्ञ जेफ क्वोंग यांनी सांगितले. हे संशोधन ‘न्यू इंग्लंड जनरल ऑफ मेडिसिन’मध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

श्वसनक्रियेवरील संक्रमण, फ्लू आणि अक्युट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन (हृदयविकार) यांचा परस्परसंबंध असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. वयोवृद्धांना फ्लूमुळे हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. या संदर्भातील मागील संशोधन, फ्लू झाल्यानंतर लसीकरणामुळे हृदयविकाराचा धोका कमी होत असला तरी एंफ्लुएन्झा किंवा विषाणूंच्या संसर्गामुळे हृद्यविकाराच्या झटक्याचा धोका अधिक असतो, असे संशोधकांनी सांगितले.