सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी Adobe ने फेक फोटोंना आळा घालण्यासाठी एक खास टूल तयार केले आहे. याद्वारे एडिट करण्यात आलेला फोटो सहज ओळखता येणे शक्य होणार आहे. हे खास टूल बनविण्यासाठी कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आहे. यामुळे एखाद्या एडिट केलेल्या फोटोमध्ये काय काय बदल केले आहेत याची माहिती मिळेल, परिणामी यामुळे फेक फोटो शोधणं सोपं होईल असा कंपनीचा अंदाज आहे.

सध्या सोशल मीडियामध्ये कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ पाहिजे तसे एडिट करुन पसरवले जातात. अनेक फोटो दिशाभूल करण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी एडिट केले जातात. हे फोटो खरे की खोटे हे ठरवणे हे अशक्य असते. याला आळा घालण्यासाठी Adobe नवीन टूल घेऊन येत आहे. या नव्या टूलची चाचणीदेखील अॅडोबने घेतली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कलेतील संशोधकांच्या सहकार्याने कंपनीने हे नवे टूल तयार केले आहे. Face Aware Liquify या फीचरच्या मदतीने फोटोमध्ये करण्यात आलेले बदल पाहता येणे शक्य आहे. या टूलच्या मदतीने खोट्या फोटोंमुळे होणारी दिशाभूल टाळता येईल असा दावा कंपनीने केला आहे.

काय आहे Face Aware Liquify-
या फिचरचा वापर नेहमी चेहऱ्याचा आकार, ओठ, डोळे व्यवस्थित करण्यासाठी करण्यात येतो. सामान्यपणे डोळ्यांनी पाहिल्यास १००पैकी ५३ वेळा एडिटेड फोटो ओळखता येतो. तर, या टूलच्या मदतीने १०० पैकी ९९ एडिटेड फोटो ओळखता येतात. या टूलने चेहऱ्यांमध्ये करण्यात आलेले बदल ओळखता आले.