सध्या सर्वच वयोगटात सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्येही फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या साईटसवर वेळ घालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. अल्पवयीन मुलेही हल्ली या साईटसवर आपली अकाऊंट उघडतात आणि सर्फिंग करतात. यामध्येही फेसबुकवर वेळ घालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. फेसबुकवर जाहीरातींचे प्रमाणही जास्त असते, हीच गोष्ट लक्षात घेत फेसबुकने अमेरिकेत १८ वर्षाखालील मुलांना फेसबुकवरील हत्यारांच्या साहित्यांच्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. अल्पवयीनांवर या जाहिरातींचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अमेरिकेत मागच्या काही काळात गोळीबारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर गोळीबाराच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य उपाययोजना राबवण्यास अमेरिकेत सुरुवात करण्यात आली आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर मॅगजीनसह हत्यारांच्या जाहिराती आणि खरेदीवर बंदी आहे. मात्र आता बंदूक ठेवण्याचा बेल्ट, बंदुकीवर लावण्यात येणारी फ्लॅशलाईट आणि बंदुकीचं कव्हर यासंबधीच्या जाहिरातींना १८ वर्षाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. २१ जूनला यासंबधीची जाहिरात पॉलिसी फेसबुककडून जारी करण्यात येणार आहे. याआधी युट्यूबने हत्यारे आणि हत्यारांच्या साहित्यांची विक्री करणाऱ्या वेबसाईट्सच्या लिंकची जाहिरात करणाऱ्या व्हिडीओवर बंदी घालणार असल्याचे म्हटले होते.