OnePlus Nord हा वन प्लस कंपनीचा ‘स्वस्त’ स्मार्टफोन 21 जुलै रोजी लाँच होणार आहे. कंपनीकडून मंगळवारी याबाबत माहिती देण्यात आली. भारतात या फोनसाठी 15 जुलैपासून प्री-ऑर्डर बुकिंग सुरू होईल अशीही माहिती कंपनीने दिली आहे. 499 रुपयांमध्ये या फोनसाठी प्री-बुकिंग करता येईल. याबदल्यात कंपनीकडून ग्राहकांना एक खास गिफ्ट बॉक्स दिला जाईल. नवीन वनप्लस नॉर्ड हा “अ‍ॅफॉर्डेबल प्राइस सेगमेंट”मधला OnePlus चा पहिला फोन असेल.

गेल्या अनेक दिवसांपासून वनप्लसचा हा फोन चर्चेत आहे. कारण या फोनसोबत कंपनी अनेक दिवसांनंतर मिड-रेंज सेगमेंटमध्ये पुनरागमन करणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये OnePlus ने किंमतीपेक्षा अनोख्या फीचर्सवर जास्त लक्ष दिलं होतं. 21 जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता एका इव्हेंटमध्ये हा फोन लाँच केला जाईल. अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबासाइटवर या फोनसाठी 15 जुलैपासून 499 रुपयांमध्ये प्री-बुकिंगला सुरूवात होणार आहे. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांनी गा फोन 31 ऑगस्टपर्यंत खरेदी केल्यास त्यांना कंपनीकडून एक गिफ्ट बॉक्स दिला जाईल. त्यामध्ये OnePlus Bullets Wireless V1 हेडफोन्ससह एक फोन कव्हर मोफत मिळेल.

आतापर्यंत आलेल्या टीझर्सनुसार OnePlus Nord तीन रिअर कॅमेरे असलेला फोन असेल हे स्पष्ट झालंय. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765 प्रोसेसर आणि दोन सेल्फी कॅमेरे असतील. याव्यतिरिक्त फोनच्या अन्य फीचर्सबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. वनप्लस नॉर्ड हा कंपनीचा आतापर्यंतचा स्वस्त स्मार्टफोन असेल अशी चर्चा आहे. या फोनची किंमत 500 डॉलरपेक्षा कमी (जवळपास 37,700 रुपये) असेल. म्हणजे नवीन वनप्लस फोन OnePlus 8 सीरिजच्या तुलनेत स्वस्त असणार आहे. OnePlus 8 सीरिजच्या बेसिक मॉडेलची किंमत 699 डॉलर म्हणजे भारतात 41,999 रुपयांपासून सुरू होते. तर, नव्या वनप्लस फोनची किंमत 25 ते 37 हजारादरम्यान असू शकते.