25 February 2021

News Flash

घटस्फोटानंतर झाली मालामाल , ‘ही’ आहे जगातील तिसरी गर्भश्रीमंत महिला !

तर पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक श्रीमंत महिला कोण?

(छायाचित्र सौजन्य : मॅकेन्झी यांचं ट्विटर अकाउंट )

Amazon या जगातल्या अव्वल ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस व त्यांची पत्नी मॅकेन्झी बेजोस हे दाम्पत्य 25 वर्षांच्या संसारानंतर गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कायदेशीरपणे विभक्त झालं. त्यावेळी पोटगी म्हणून मॅकेन्झी यांना जेफ बेजोस यांनी Amazonमधील शेअर्सचा एक चतुर्थांश हिस्सा देण्याचं ठरलं होतं. जुलै महिन्याच्या अखेरीस ही प्रक्रिया पार पडेल असं तेव्हा जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार शेअर्सचा एक चतुर्थांश हिस्सा मॅकेन्झी यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया नुकतीच म्हणजे 29 जुलै रोजी पार पडली आहे. ‘फोर्ब्स’ने दिलेल्या वृत्तानुसार आता मॅकेन्झी यांनी अधिकृतपणे जगातील सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत तिसरा क्रमांक गाठलाय. यासोबतच ‘ब्लूमबर्ग बिलिनियर्स’च्या यादीनुसार त्या आता जगातील 23 व्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरल्या आहेत.

‘फोर्ब्स रिअल-टाइम’च्या दि. 1 ऑगस्ट रोजीच्या आकडेवारीनुसार, मॅकेन्झी यांच्याकडे आता Amazonच्या 19.7 दशलक्ष समभागाची मालकी आहे. म्हणजे तब्बल 36.8 अब्ज डॉलर एवढ्या प्रचलित मूल्याचे भागभांडवल त्यांच्या एकटीच्या मालकीचे झाले आहे. अर्थात जवळपास 25 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक संपत्तीच्या त्या आता मालकीण आहेत. विशेष म्हणजे संपत्तीचा इतका मोठा हिस्सा देऊन देखील जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ बेजोस यांचं अव्वलस्थान कायम आहे.

तरीही जेफ बेजोस अव्वलस्थानी कसे? –
विभक्त होणार असल्याची माहिती दोघांनीही जानेवारी महिन्यातच ट्विटरद्वारे दिली होती. जेफ व मॅकेन्झी यांनी मुलांच्या पालकत्वासंबंधी स्वतंत्र समझोता केला आहे. संपत्तीचा इतका मोठा हिस्सा देऊन देखील जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ बेजोस यांचं अव्वलस्थान कायम आहे. Amazonच्या समभागांपैकी एक चतुर्थांश भागभांडवल नावावर झाले तरी त्याचे कंपनीच्या सभांमधील मतदानाचे हक्क मात्र मॅकेन्झी यांच्याकडे नाहीयेत. परिणामी कंपनीच्या कामकाजात त्यांना दखल देता येणार नाहीये, ते अधिकार जेफ बेझोस यांच्याकडेच कायम आहेत. त्यामुळे अ‍ॅमेझॉनचे नियंत्रक मालक ही जेफ यांची बिरुदावली कायम राहणार आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीचे एकूण 16 टक्के भागभांडवल बेझोस दाम्पत्याकडे होते. घटस्फोटानंतरही जेफ यांच्याकडे Amazonचे 12 टक्के भागभांडवल कायम आहे. त्याचे सध्याचे मूल्य 117.8 अब्ज डॉलर एवढे आहे, हे मूल्य दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यापेक्षा 13 अब्ज डॉलरांनी अधिक आहे.

पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावरील श्रीमंत महिला कोण?- प्रख्यात सौंदर्य प्रसाधन कंपनी L’Oréal च्या फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स (Francoise Bettencourt Meyers)या पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 53.7 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर वॉलमार्टचे संस्थापक सॅम वॉल्टन यांची मुलगी अ‍ॅलिस वॉल्टन या आहेत. त्यांच्याकडे 50.4 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.

निम्मी संपत्ती दान करणार मॅकेन्झी –
मे महिन्यात मॅकेन्झी यांनी घटस्फोटापोटी मिळणाऱ्या संपत्तीपैकी निम्मी संपत्ती दानधर्म करणार असल्याचं जाहीर केलं होतं. जगभरातील गर्भश्रीमंतांनी आपली जास्तीत जास्त संपत्ती दान करण्याचे आवाहन करणारा एक खुला वचननामा अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफेट व मायक्रोसॉफ्टच संस्थापक बिल गेट्स यांनी जारी केला होता. मॅकेन्झी यांनी या वचननाम्यावर स्वाक्षरी करून आपली निम्मी संपत्ती दान करण्याचे जाहीर केले होते.

मॅकेन्झी होती पहिली कर्मचारी –
जेफ बेजोस यांनी 1994 साली Amazon ची स्थापना केली. मॅकेंजी ही Amazon कंपनीतील पहिली कर्मचारी होती. आज Amazon जगातला एक प्रसिद्ध ब्रँड बनला आहे. बेजोस यांच्याकडे सध्या Amazon गृपच्या 15 पेक्षा अधिक कंपन्यांची मालकी आहे. याशिवाय ते एक वृत्तपत्र, एक रॉकेट कंपनी तसेच अनेक वेबसाईट कंपन्यांचे मालक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 6:16 pm

Web Title: after richest divorce settlement in history mackenzie bezos is now officially worlds third richest woman sas 89
Next Stories
1 अजूनही भारतीय रस्त्यांवर Tesla का नाही? इलॉन मस्कने भरमसाठ करावर फोडलं खापर
2 Alert ! तुमच्याही WhatsApp वर येत आहे का ‘हा’ मेसेज, व्हा सावधान
3 Huawei Y9 Prime 2019 : भारतातला सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच
Just Now!
X