दोन माणसे एकत्र आली तर त्यांचे पटतेच असे नाही, त्यातून वादविवाद होतात. लोक एकमेकांवर संतापतात. याला दोन मित्र, कर्मचारी व त्याचे वरिष्ठ, पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी कुणीच अपवाद नाहीत.

या वादविवादानंतर मनावर मोठा ताण येतो, तो कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घेऊन तो हळूहळू सोडणे हा एक उपाय तर आहेच; पण वैज्ञानिकांच्या मते मन शांत करण्यासाठी तुम्ही वादविवादानंतर निळ्या प्रकाशात जाऊन बसलात तर तुम्हाला नक्कीच शांत वाटेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी या प्रकाशाचा चांगला उपयोग होतो, असा दावा स्पेनमधील ग्रॅनडा विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केला आहे. विद्युत शारीरिक मापनांनी या ताणाचे कमी-जास्त होणे मोजता येते, असेही त्यांचे म्हणणे आहे.

नेहमीच्या पांढऱ्या किंवा पिवळ्या प्रकाशापेक्षा निळ्या प्रकाशात मन लवकर शांत होते. अनेकदा मानसिक ताण हा कमी काळाचा असतो, तो निवळतोही पण त्याला वेळ हा लागतोच. पण तो लगेच कमी व्हावा असे वाटत असेल तर निळ्या प्रकाशाचा आधार आहे. अनेकदा मित्रांशी वादविवाद होतात. कुणी तरी तुम्हाला ठरावीक वेळेत काम करण्यास सांगते तेव्हा या परिस्थितीत विशिष्ट ताण येत असतो. ताणामुळे शरीरात काही जैविक संदेश निर्माण होतात. त्यामुळे ते मोजताही येतात. हृदयाचे ठोके, मेंदूची सक्रियता यांचे मापन यात केले जाते.

निळ्या प्रकाशाने नेहमीच्या प्रकाशापेक्षा तणाव लवकर निवळतो, असे ‘मिस्ट’ नावाच्या सहा मिनिटांच्या प्रयोगात दिसून आले आहे. यात हृदयाचा इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) तर मेंदूचा इलेक्ट्रोएनसफेलोग्राम (ईईजी) काढला जातो, असे ‘प्लॉस वन’ या नियतकालिकात म्हटले आहे.