हवा प्रदूषणामुळे किशोरवयीन मुलांचे वर्तन अधिक आक्रमक बनते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. हवा प्रदूषणामुळे जे सूक्ष्म विषारी कण शरीरात जातात, त्यामुळे मेंदूतील भावना व निर्णयाशी संबंधित मार्गिकांना धोका निर्माण होतो. आजच्या काळात शहरी भागात स्वच्छ हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळेच अलीकडे दिल्लीत मोठे ऑक्सिजन पार्लरही सुरू करण्यात आले. दिल्लीत हवा प्रदूषणाची समस्या गंभीर बनलेली आहे.

हवा प्रदूषणात २.५ पीएम म्हणजे केसापेक्षा ३०पट सूक्ष्म असलेले कण शरीरात जात असतात त्यामुळे आरोग्य बिघडते, असा दावा या संशोधनातील प्रमुख डायना यूनान यांनी केला आहे. हे सूक्ष्म कण शरीरात गेल्यानंतर फुफ्फुस व हृदयास घातक ठरतात. पीएम २.५ कण हे मेंदूला घातक असतात, त्यामुळे मेंदूतील जोडण्या बिघडतात. परिणामी, तरुण मुलांच्या वर्तनात आक्रमकता येते. जर्नल ऑफ अ‍ॅबनॉर्मल चाइल्ड सायकॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे, की ९ ते १८ वयोगटांतील मुलांची पाहणी केली असता त्यांच्यात प्रदूषणामुळे वर्तन बदललेले दिसले. ग्रेटर लॉस एंजल्समधील ६८२ लोकांची पाहणी यात करण्यात आली. ते नऊ वर्षांचे असतानापासूनची माहिती यात तपासण्यात आली. त्यात आई-वडिलांनी त्यांची वर्तन चाचणी वेळोवेळी केलेली होती. यात मुलांनी खोटे बोलणे, फसवणे, चोऱ्या करणे, जाळपोळ व शिवीगाळ करणे, गुंडागर्दी करणे अशी लक्षणे दिसून आली. प्रत्येक व्यक्तीची चार मूल्यमापने यात विचारात घेतली गेली. २००० ते २०१४ या काळात दक्षिण कॅलिफोर्नियातील हवा प्रदूषण तपासण्यात आले. संबंधित मुले ही सुरक्षित प्रमाणापेक्षा जास्त हवा प्रदूषण सहन करीत होते. सुरक्षित प्रमाण हे दर घनमीटरला १२ मायक्रोग्रॅम इतके आहे. प्रदूषणाचा हृदय व फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो, पण मानवी वर्तनातही त्यामुळे फरक पडून मेंदूचे कार्य बिघडते, असे प्रथमच दिसून आले आहे, असे संशोधक जिऊ चिआन चेन यांनी म्हटले आहे.