टेलिकॉम कंपनी व्होडाफोन -आयडियाच्या ग्राहकांना लवकरच झटका बसण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने अॅव्हरेज ग्रॉस रेव्हेन्यू (AGR) ची रक्कम फेडण्याचे आदेश दिल्यानंतर कंपनीने डेटा आणि कॉलच्या दरात ७ ते ८ टक्के दरवाढ करण्याची मागणी केली आहे.

सेवा सुरू ठेवण्यासाठी आम्ही एक एप्रिलपासून कॉल आणि डेटाच्या दरांमध्ये वाढ करु असं कंपनीने म्हटलं आहे. याशिवाय कंपनीने एजीआरची थकीत रक्कम भरण्यासाठी १८ वर्ष आणि व्याजासह दंडाची रक्कम फेडण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी मागितला आहे. तसेच, मोबाइल डेटाचे किमान शूल्क वाढवून 35 रुपये प्रति GB करण्याची कंपनीची मागणी आहे. हा दर सध्याच्या दरांपेक्षा जवळपास सात-आठ टक्के अधिक आहे. यासोबतच कंपनीने एका निर्धारित मासिक शुल्कासह कॉल सेवांसाठी 6 पैसे प्रतिमिनिट दर करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोर्टाने या मागणीचा विचार केलेला नाही.

व्होडाफोन आयडियाचे सरकारकडे मदतीचे आर्जव :- यापूर्वी, ध्वनिलहरी व परवानासाठीच्या शुल्कापोटी सुमारे ५३,००० कोटी रुपयांची थकीत रक्कम असलेल्या व्होडाफोन आयडियाने दूरसंचार विभागाला पत्र लिहून याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुदत दिल्यानंतर कंपनीने आतापर्यंत आतापर्यंत एकूण थकीत रकमेपैकी केवळ ७ टक्के रक्कमच (३,५०० कोटी रुपये) विभागाकडे जमा केली आहे. सुमारे ३५,००० कोटी रुपये थकीत असलेल्या भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनिल भारती मित्तल यांनीही गेल्याच आठवडय़ात अशाच प्रकारचा इशारा सरकारला दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर व्होडाफोन आयडियाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला तसेच सुनिल भारती मित्तल यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री, दूरसंचार विभागाचे सचिव यांची भेट घेतली होती. थकीत रकमेबाबत सरकारने दिलासा दिला नाही तर आर्थिकदृष्टय़ा कंपनीला व्यवसाय करणे शक्य होणार नाही, असे व्होडाफोन आयडियाने पत्रात नमूद केले आहे. शुल्क कपात, अप्रत्यक्ष करातील कपात तसेच थकीत शुल्क, व्याज व दंडाबाबत सवलत देण्याची मागणीही करण्यात आली आहे. ‘जीएसटी क्रेडिट’पोटी ८,००० कोटी रुपयांच्या ‘सेट ऑफ’ची मागणीही कंपनीने केली आहे. दूरसंचार कंपन्यांकडील थकीत रक्कम फेडण्यासाठी १५ वर्षांचा कालावधी द्यावा व या दरम्यान वार्षिक ६ टक्के व्याज आकारावे, अशी सूचनाही व्होडाफोन आयडियामार्फत दूरसंचार विभागाला करण्यात आली आहे. १० हजारांहून अधिक थेट रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या व्होडाफोन आयडियाने गेल्या सलग काही वर्षांपासून तोटा नोंदविला आहे.