कार कंपन्यांना आता कारमध्ये पुढील दोन्ही सीटसाठी एअर बॅग देणं बंधनकारक होण्याची शक्यता आहे. मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबतचा एक मसुदा आणलाय. यानुसार, 1 एप्रिल 2021 पासून सर्व नवीन कारसाठी एअर बॅग देणं बंधनकारक असेल. तर, आधीपासून अस्तित्त्वात असलेल्या गाड्यांसाठी नवीन नियमांचे पालन करण्याची तारीख 1 जून 2021 असेल.

प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी मोटारींच्या किंमतीचा विचार न करता ही अनिवार्य तरतूद केली जात असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसोबत तडजोड केली जाणार नाही असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय. यापूर्वी 1 जुलै 2019 पासून सर्व कारमध्ये वाहनचालकांसाठी एअर बॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं या हेतूने हा नियम लागू करण्यात आला होता.

मात्र केवळ एक एअरबॅग सुरक्षेसाठी अपुरी पडते, एकच एअर बॅग असल्याने चालकाच्या सुरक्षेची खात्री असते पण चालकासोबत पुढे बसणाऱ्या प्रवाशाच्या सुरक्षेला मात्र धोका असतो, त्यामुळे आता पुढील दोन्ही सीटसाठी एअर बॅग देणं बंधनकारक होणार आहे.