प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी विशेषत: बंदिस्त जागेतील प्रदूषण किती आहे तसेच हवेची प्रतवारी मोजण्याबाबत चीनच्या एका कंपनीने लेसरवर आधारित सेंसेज हे यंत्र बाजारात आणले आहे. भारतीय हवामान ध्यानात घेऊन याची रचना करण्यात आली आहे.

बैठय़ा कामांमध्येच लोक व्यस्त असतात. त्यामुळे कामाचा अधिकाधिक वेळ कार्यालयात घालवतात. त्यामुळे इमारतींमध्ये आरोग्यदायी वातावरण असावे यासाठी याची निर्मिती केल्याचे कैटीरा या कंपनीचे सहसंस्थापक लिम बेट्स यांनी स्पष्ट केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १४ मे रोजी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जगातील सर्वात २० प्रदूषित शहरांपैकी भारतामधील १४ शहरे आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महत्त्वाचे आहे. हे नवे यंत्र सध्याची प्रदूषणाची पातळी काय आहे. त्याचे अचूक निरीक्षण, हवेतील कार्बनचे प्रमाण, तापमान व आद्र्रता या गोष्टी दाखवून देईल. लेसर तंत्रज्ञानाद्वारे याची नोंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे हवेतील विविध घटक लेसरवर आदळून त्याचे पृथक्करण करतील. विशेष म्हणजे यातील तंत्रनुसार ते पृथक्करण लगेच मिळेल. त्यामुळे सध्याची हवेची नेमकी प्रतवारी समजणे सोपे जाणार आहे. हवेतील प्रत्येक घटकाची नोंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे जर प्रदूषणाची पातळी जास्त असल्यास काय उपाययोजना करायच्या याचा निर्णय घेता येणार आहे.