वायू प्रदूषण अगदी थोडय़ा कालावधीसाठीही सहन करावे लागले तरी, गर्भपात घडून येण्याचा धोका वाढतो, असे अभ्यासकांना दिसून आले आहे. हवेचा दर्जा चांगला नसेल, तर त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होतो. यातून अस्थमा ते मुदतपूर्व प्रसूती आदी समस्या निर्माण होऊ शकतात.

याबाबत अमेरिकेतील उताह विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यास केला आहे. उताह राज्यातील दाट लोकसंख्येच्या भागात राहणाऱ्या महिलांची त्यांनी पाहणी केली. यापैकी ज्या महिलांचा कमी काळ का होईना, पण मोठय़ा प्रमाणावर प्रदूषित झालेल्या हवेशी संपर्क आला, त्यांच्यात गर्भपात होण्याचा धोका अन्य महिलांच्या तुलनेत १६ टक्के अधिक असल्याचे दिसून आले.

हा अभ्यास अहवाल ‘फर्टिलिटी अ‍ॅण्ड स्टेरिलिटी’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. १३०० महिलांची पाहणी करून तो तयार केला आहे. त्यांचे सरासरी वय २८ वर्षे आहे. २००७ ते २०१५ दरम्यान या पाहणीतील महिलांनी गर्भपात घडून आल्यानंतर (२० आठवडय़ांच्या काळातील) आपत्कालीन आरोग्य सेवेकडे मदत मागितली होती.

हवेतील सूक्ष्म तरंगते कण (पीएम २.५), नायट्रोजन डायऑक्साइड आणि ओझोन हे वायू प्रदूषणातील तीन सर्वसाधारण घटक या अभ्यासात लक्षात घेण्यात आले. त्यांचे प्रमाण मर्यादेबाहेर असल्यास तीन ते सात दिवसांच्या कालावधीत महिलांमधील गर्भपाताच्या धोक्याची शक्यता अभ्यासकांच्या पथकाने तपासली. विशेषत: नायट्रोजन डायऑक्साइडचे हवेतील प्रमाण विहित मर्यादेपेक्षा अधिक असल्यास महिलांना गर्भपाताचा धोका जास्त असतो, असे दिसून आल्याची माहिती उताह विद्यापीठाचे क्लेअर लिसेर यांनी दिली.