वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या हवाप्रदूषणामुळे बालपणातच मुलांच्या मेंदूची वाढ योग्य पद्धतीने होत नाही. याशिवाय वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत मेंदूच्या रचनेत चुकीचे बदल हे प्रदूषक रसायनांनी घडून येतात. त्यातून मानसिक व शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. प्लॉस वन या नियतकालिकात प्रसिद्ध शोधनिबंधात म्हटल्यानुसार वाहतुकीशी संबंधित प्रदूषकांच्या परिणामाने मुलांमध्ये मेंदूची वाढ खुंटते त्यात मेंदूतील करडय़ा रंगाचा भाग कमी होतो.

मेंदूच्या बाहेरच्या भागाची जाडीही कमी राहते. अमेरिकेतील सिनसिनाटी चिल्ड्रेन हॉस्पिटल मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी म्हटले आहे की, बारा वर्षे वयाच्या मुलांची एमआरआय चाचणी केली असता ज्यांना प्रदूषणाचा सामना करावा लागला त्या मुलात मेंदूचा विकास कमी दिसून आला.

सिनसिनाटी भागातील २७ ठिकाणचे हवेच्या प्रदूषणाचे नमुनेही त्यासाठी गोळा करण्यात आले होते. त्यात चार ते पाच ठिकाणी वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण जास्त होते. या भागातील मुलांना वयाच्या १,२,३, ४,७ व १२ व्या वर्षी रुग्णालयात नेण्याची वेळ आली होती.

प्रदूषणामुळे मेंदूचा खूपच ऱ्हास होतो अशातला भाग नाही पण मेंदूच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होतो त्यामुळे मेंदूतील करडय़ा रंगाचा भाग कमी होतो. त्या भागात चेता पेशी या ग्लायल पेशींमध्ये गुंडाळलेल्या असतात. त्यामुळे शरीराच्या अवयवांच्या हालचारी सुकर होतात. मेंदूच्या बाहेरच्या कॉर्टेक्स या थराची जाडीही वाहतूक प्रदूषणामुळे कमी राहते. प्रदूषणकारी रसायनांमुळे मेंदूचा विकास कमी झाल्याने मुलांचे बोलणे, हालचाली, आकलन यावर वाईट परिणाम होतो.