वाढत्या प्रमाणातील हवा प्रदूषणामुळे प्रौढांमध्ये अस्थमा होण्याचा धोका असतो हे मागील अभ्यासात दिसून आले होते. मात्र प्रदूषणाच्या कमी पातळीमध्येही अस्थमा (दमा) होण्याचा धोका असल्याचा इशारा नव्या संशोधनात देण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियात याबाबतचे संशोधन करण्यात आले. ४० ते ५० वयोगटातील जे लोक मुख्य रस्त्यापासून २०० मीटरच्या अंतरात राहतात त्यांना दमा होण्याचा धोका ५० टक्के होता असे आढळून आले. ऑस्ट्रेलियामध्ये तुलनेत नायट्रोजन डायऑक्साइड कमी असूनही येथील आरोग्याच्या समस्येमध्ये वाढ झाल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

या अभ्यासासाठी ४५ ते ५० वयाच्या ७०० लोकांचा समावेश करण्यात आला होता. विकासाच्या प्रक्रियेत असलेल्या दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियामध्ये हवा प्रदूषणाची पातळी कमी आहे. असे असूनही येथे प्रौढांमध्ये दम्याचे वाढते प्रमाण आणि फुप्फुसाच्या कार्यात बिघाड दिसून येत असल्याचे संशोधकांनी सांगितले. शासनाने रस्त्यांवर होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी, खासकरून डिझेल ट्रकमध्ये आवश्यक ते संशोधन करणे आवश्यक आहे. डिझेल हे पेट्रोलपेक्षा जास्त हानीकारक आहे.

कारण ज्या वेळी डिझेल जळते त्या वेळी अधिक प्रमाणात प्रदूषके तयार होतात. ती आरोग्यासाठी धोकादायक असतात, असे संशोधकांनी सांगितले. पर्यावरणाची स्थिती बिघडल्याने विसाव्या शतकात दम्याच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. रस्ते वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे श्वसनविकारांत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.