-डॉ. जयलक्ष्मी टी. के. (सल्लागार, पल्मोनोलॉजी, अपोलो हॉस्पिटल)

हवेतील प्रदूषके व विषारी घटकांचे प्रमाण वाढत असल्याने श्वसनविषयक संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो आहे आणि लंग कॅन्सरची भीतीही वाढते आहे. अलीकडच्या काळात, नवी दिल्ली व मुंबई यासारख्या प्रमुख महानगरांत आणि पाटणा व मुझ्झफरपूर अशा शहरांमध्ये वायूप्रदूषणाचे तीव्र प्रमाण आढळून आले. ख्रिसमसच्या दिवशी मुंबईमध्ये हवेची गेल्या नऊ महिन्यांतील सर्वात भीषण स्थिती नोंदवण्यात आली आणि PM2.5 साठी एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) 240 या श्रेणींपर्यंत घसरल्याचे आढळले. वायूप्रदूषणाचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय करण्याचा प्रयत्न अद्याप सुरू असला तरी श्वसनविषयक संसर्ग व कॅन्सर होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी काही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

1. नाकासाठी फिल्टर
नाकामध्ये पातळ, लवचिक पटल बसवले जाते. नाकातील हा फिल्टर बहुतेकशी धूळ व विषारी प्रदूषके यांना नाकात शिरण्यापासून रोखतो. त्यामध्ये, सर्वेक्षणाच्या मते फुप्फुसांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवू शकतात अशा PM2.5 या घातक कणांचा समावेश असतो.

2. एअर मास्क
काळजीपूर्वक निवड केल्यास, एअर मास्कच्या वापरानेही प्रदूषकांना दूर ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. N95, N99, N100 हे मास्क हवेतील प्रदूषके रोखण्यासाठी सर्वात परिणामकारक असल्याचे समजले जाते. हे मास्क विषारी कणांमपैकी किमान 95% कणांना फिल्टर करतात.

3. एअर प्युरिफायर्स
अस्थमा व अॅलर्जी यांना चालना देणारे घटक कमी करण्यासाठी एअर प्युरिफायर्समुळे मदत होतेच, शिवाय हवा दूषित होणे रोखण्यासाठीही मदत होते. ते हेपा फिल्टरचा वापर करून सिगारेटचा धूर ट्रॅप करतात व त्यामुळे फुप्फुसाचे आजार होण्यास प्रतिबंध केला जातो. घरामध्ये व कार्यालयामध्ये एअर प्युरिफायर्स बसवल्यास इनडोअर हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होते. इनबिल्ट प्युरिफायर्स व फिल्टर्स असणारे विविध एसी सध्या बाजारात मिळू लागले आहेत. त्यामुळे प्रदूषित हवा बाहेर ठेवण्यासाठीही मदत होते.

4. सकस आहार
भाज्या व व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असलेली फळे यांचा समावेश असणारा सकस आहार प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. प्रतिकारक्षमता वाढल्यास, शरीराला कोणत्याही स्वरूपातील संसर्गाचा सामना करणे शक्य होते. संत्री, लिंबू व द्राक्षे अशी फळे, लसूण व लाल भोपळी मिरची यामुळेही प्रतिकारक्षमता वाढते.

5. धुळीची क्षेत्रे टाळणे
धूळ असणाऱ्या परिसरांमध्ये जाणे किंवा कोणत्याही प्रकारच्या धुळीचा संबंध येणे शक्य तितके टाळावे. योग्य स्वच्छता राखून व घराभोवती जाळी लावून इन्डोअर हवा प्रदूषण कमी केल्यासही स्वच्छ हवा येण्यासाठी मदत होईल.