हवा प्रदूषण जास्त असलेल्या भागातील लोकांना निद्रानाश जडण्याची शक्यता ६० टक्क्यांनी अधिक असते. त्यांना गुड नाइट स्लीपऐवजी बॅड नाइट स्लीपचा सामना रोजच करावा लागतो. अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापक मार्था इ बिलिंग्ज यांनी सांगितले, की या अभ्यासातून हवा प्रदूषणाचा नवा धोका लक्षात आला आहे. हवा प्रदूषणामुळे केवळ फुफ्फुस व हृदयाचेच रोग जडतात असे नाही तर झोपेवरही वाईट परिणाम होतो. सरासरी ६८ वर्षे वयाच्या १८६३ लोकांवर याबाबत प्रयोग करण्यात आले. नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण वाहतूक प्रदूषणात जास्त असते, शिवाय हे कण पीएम २.५ प्रकारचे म्हणजे सूक्ष्म असतात. या सगळय़ा सहभागी रुग्णांचा अभ्यास १ ते ५ वर्षे या कालावधीसाठी करण्यात आला. त्यांच्या झोपेची क्षमता मोजण्यात आली. ते बिछान्यात किती वेळ जागे व किती वेळ झोपलेले असतात याची नोंद घेण्यात आली. रिस्ट अ‍ॅक्टिग्राफीने झोपेतील हालचाली लागोपाठ सात दिवस तपासण्यात आल्या. यात संशोधकांना असे दिसून आले, की पाच वर्षे नायट्रोजन ऑक्साइड जास्त असलेल्या भागातील लोकांमध्ये निद्रानाशाचा किंवा कमी झोपेचा धोका ६० टक्के अधिक होता. पीएम २.५ कणांचे जास्त प्रमाण असलेल्या भागातील लोकांना झोपेचा त्रास होण्याचे प्रमाण ५० टक्के अधिक होते. हवा प्रदूषणामुळे झोपही धोक्यात येते असे बििलग यांचे मत आहे.