हवेने भरलेले घर, गाद्या, शिडय़ा अशी खेळणी आपण नेहमीच पाहतो. लहान मुलेही या खेळण्यांवर उडय़ा मारून आनंदाने डोलत असतात. मात्र, पालकांनी हा धोका ओळखून अशा खेळण्यांपासून मुलांना दूर ठेवण्याची गरज आहे. कारण अशा हवायुक्त खेळण्यांमुळे मुलांना कर्करोग होण्याचा धोका असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

जर्मनीतील फ्रॉनहोपर या संस्थेने समुद्रकिनाऱ्यावर खेळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खेळणी आणि पोहण्यासाठी वापरण्यात येणारी वर्तुळाकार कडी याचा मानवावर होणारा परिणाम यासंबंधी नुकतेच संशोधन केले आहे. ही खेळणी बनविताना मोठय़ा प्रमाणावर वापरण्यात येणाऱ्या पॉलिव्हिनेल क्लोराईड या घटकामुळे कर्करोगाचा धोका असल्याचे संशोधकांनी सिद्ध करून दाखविले आहे. या खेळण्यांना विशिष्ट गंध येत असल्याचेही संशोधकांच्या लक्षात आले. या गंधामुळे शरीरातील संवेदनशील भागांवर याचा घातक परिणाम होत असल्याचे संशोधन सांगते. या संशोधकांनी यातील ४६ गंधांचा अभ्यास केल्यावर असे आढळले की यांपैकी १३ गंधी अतितीव्र होते. या गंधामध्ये विविध घातक घटकांचा समावेश असल्याने तो लहान मुलांसाठी अधिक धोकादायक ठरतो. यातील घटक कर्करोगाला साहाय्यभूत ठरत असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.