टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओ आपल्या सर्व प्लॅन्ससोबत जिओच्या अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन मोफत देते. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनेही आपल्या अनेक प्लॅन्ससोबत अ‍ॅमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्स यांसारख्या अ‍ॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन देण्यास सुरूवात केली होती. पण आता कंपनीने आपल्या काही प्लॅन्ससोबत नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन मोफत देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्लॅन्ससोबत कंपनीने ही सेवा बंद केली आहे त्यात एअरटेल Xstream फायबर ब्रॉडबँड आणि पोस्टपेड प्लॅन्सचा समावेश आहे. दुसरीकडे व्होडाफोन आणि ACT फायबरनेट यांसारख्या स्पर्धक कंपन्या अद्यापही ही सुविधा देत आहेत.

भारती एअरटेलने आपल्या काही पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लॅनसोबत 3 महिन्यांसाठी नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन ऑफर दिली होती. आता ही ऑफर बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. याबाबत कंपनीने आपल्या वेबसाइटवरही अपडेट दिले आहेत. वैधता संपेपर्यंत युजर्सची ही सेवा सुरू असेल, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

एअरटेलच्या नव्या पोस्टपेड आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी भलेही मोफत नेटफ्लिक्स उपलब्ध नाहीये, पण अन्य अनेक सुविधा अद्यापही कंपनीकडून दिल्या जात आहेत. एअरटेलच्या बहुतांश पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लॅनसोबत अ‍ॅमेझॉन प्राइम, Zee5 आणि Xstream यांसारख्या अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन मिळतं. उदाहरण म्हणजे एअरटेलच्या 499 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 75 जीबी डेटा आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याशिवाय एक वर्षासाठी अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप, Zee5 आणि Xstream यांसारख्या अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन आणि हँडसेट प्रोटेक्शनही मिळते.