आघाडीची टेलिकॉम आणि इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी भारती एअरटेलने स्वातंत्र्यदिनानिमित्त खास ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार कंपनी आपल्या ‘एअरटेल Xstream Fiber ब्रॉडबँड कनेक्शन’वर तब्बल 1000 जीबी अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. पण, कंपनीची ही ऑफर सर्व ग्राहकांसाठी नाहीये. जाणून घेऊया या ऑफरबाबत.

शुक्रवारी एअरटेलने स्वातंत्र्यदिनानिमित्त नवीन एक्स्ट्रीम फायबर कनेक्शन घेणाऱ्यांसाठी 1000 जीबी अतिरिक्त डेटाच्या ऑफरची घोषणा केली. ही ऑफर केवळ नवीन कनेक्शन घेणाऱ्यांसाठीच असणार आहे. नवीन कनेक्शन घेणाऱ्या सर्व युजर्ससाठी ही ऑफर लागू असेल. तसेच ही मर्यादित कालावधीची ऑफर असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. मोफत मिळणाऱ्या अतिरिक्त  1000 जीबी डेटाची व्हॅलिडिटी सहा महिन्यांपर्यंत आहे. अनलिमिटेड डेटा आणि प्रीपेड ब्रॉडबँड प्लॅनवर कंपनीची ही ऑफर मिळणार नाही. ज्या ठिकाणी एअरटेल एक्स्ट्रीम फायबर सेवा सुरू आहे, त्या सर्व शहरांमध्ये कंपनीची ही ऑफर लागू असेल.

‘एअरटेल Xstream Fiber ब्रॉडबँड कनेक्शन’मध्ये युजर्सना अल्ट्रा-फास्ट ब्रॉडबँडचा जवळपास 1Gbps इतका स्पीड मिळतो. किमान 799 रुपये दरमहा हा कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन असून यामध्ये ग्राहकांना 12 महिन्यांपर्यंत अ‍ॅमेझॉन प्राइमची मोफत , एअरटेल थँक्स बेनिफिट्स आणि विंक म्युझिकचा मोफत अ‍ॅक्सेसही मिळतो.

करोना व्हायरसच्या संकटामुळे भारतात वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. विद्यार्थांचेही ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, तर नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राईमसारख्या ओटीटी अ‍ॅप्सचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशात आता एअरटेलने नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही शानदार ऑफर आणली आहे.