रिलायन्स जिओ बाजारात आल्यापासून सर्वच कंपन्यांनी आकर्षक प्लॅन्स देण्यास सुरुवात केली आहे. दिवसागणिक कंपन्या आपले आकर्षक प्लॅन जाहीर करुन ग्राहकांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकताच एअरटेलने असाच एक आकर्षक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये कोणाचा प्लॅन किती चांगला आणि किती स्वस्त यामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

यामध्ये कॅशबॅक ऑफरचेही प्रस्थ वाढले आहे. नुकतीच रिलायन्स जिओने रेडमीसोबत मिळून कॅशबॅकची ऑफर दिली होती. आता एअरटेलने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर सादर केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना खूपच स्वस्तात अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. प्रीपेड ग्राहकांसाठी असणारा हा प्लॅन खऱ्या अर्थाने स्वस्त आहे असे म्हणता येईल. एअरटेलच्या ऑफरमध्ये प्रीपेड ग्राहकांना ९ रुपयांमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, १०० SMS आणि १०० MB इंटरनेट डेटा मिळणार आहे. कंपनीने अनलिमिटेड म्हटले असले तरीही कॉलची संख्या २५० मिनिटे ठेवण्यात आली आहे. याशिवाय ३ जी आणि ४ जी स्पीडचे इंटरनेट मिळू शकेल.

हा एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लान असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे एअरटेलचा हा प्लॅन देशात सर्व ऑपरेटींग सेक्टरमध्ये उपलब्ध असेल. तसेच युजर्स वेबसाईट व्यतिरिक्त इतर ठिकाणी रिचार्ज करुनही हा प्लॅन घेऊ शकतात. मात्र या प्लानची वैधता एक दिवसाची असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना जास्त फोन करावे लागतात त्यांच्यासाठी हा प्लॅन नक्कीच फायद्याचा आहे असे म्हणता येईल.