रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी मागच्या काही महिन्यांत कंपन्या सरसावल्या आहेत. जिओने स्वस्तात प्लॅन दिल्याने इतर कंपन्याही आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन जाहीर करत आहेत. एअरटेल कंपनीही यात मागे नसून नुकताच कंपनीने आपला एक खास प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना ५५८ रुपयांत ८२ दिवसांसाठी ३ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण २४६ इतका डेटा मिळेल.

इंटरनेट सुविधेबरोबरच एअरटेलच्या या नव्या पॅकमध्ये लोकल आणि एसटीडी अनलिमिटेड वॉईस कॉलिंग तसेच रोज मोफत १०० मेसेज मोफत मिळतील. सध्या रिलायन्स जिओ ५०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज ४ जीबी ४ जी डेटा देत आहे. मात्र या प्लॅनची वैधता केवळ २८ दिवसांची आहे. त्यामुळे एअरटेलचा ५५८ रुपयांचा नवीन प्लॅन जिओला टक्कर देण्याची शक्यता आहे. याआधी वोडाफोननेही आपल्या ग्राहकांसाठी असाच एका प्लॅन जाहीर केला होता. त्यामध्ये ५६९ रुपयांत रोज ३ जीबी डेटा मिळत होता. त्याची वैधता ८४ दिवसांची होती.

याआधी एअरटेलने आणखी एक प्लॅन दिला होता. त्यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा वापरता येतो. यामध्ये रोजची मर्यादा संपल्यानंतरही इंटरनेट वापरता येणार असून त्याचा वेग कमी होईल. त्यामुळे मर्यादा संपल्यावरही ग्राहक आपले फेसबुक, व्हॉटसअॅप आणि गुगल वापरु शकणार आहेत. यासोबतच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगबरोबरच एसएमएसची सुविधाही देण्यात आली आहे. हा प्लॅन ३ जी आणि ४ जी अशा दोन्ही प्रीपेड ग्राहकांसाठी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. जिओच्या ४४८ रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी एअरटेलने हा प्लॅन लाँच केला आहे. दरम्यान, एअरटेलने आपला १४९ रुपयांचा आणखी एक प्लॅनही नुकताच लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी आणि एकूण ५६ जीबी डेटा मिळत आहे. याबरोबरच कंपनीने ४४९ रुपयांमध्ये ग्राहकांना १४० जीबी डेटा देऊ केला आहे, तोही ७० दिवसांसाठी.