एअरटेल, व्होडाफोन आणि जिओ यांच्यातील स्पर्धा तीव्र झाली आहे. रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केल्यापासून ही स्पर्धा चांगलीच रंगली आहे. ग्राहकांना एकाहून एक आकर्षक ऑफर देण्यासाठी या सर्व कंपन्यांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरु असल्याचे चित्र आहे. नुकतीच यामध्ये आणखी एक भर पडली असून एअरटेलने धमाकेदार ऑफर आणली आहे. आपल्या ग्राहाकांना खुश करण्यासाठी कमी रुपयांमध्ये जास्त इंटरनेट डेटा देत एअरटेलने ही ऑफर लाँच केली आहे.

९७ रुपयांच्या कॉम्बो प्लॅनमध्ये कंपनीकडून १.५ जीबी इंटरनेट डेटा आणि ३५० मिनिटे कॉलिंग मिळणार आहे. यामध्ये लोकल आणि एसटीडी कॉलिंग अशा दोन्हींचा समावेश आहे. तर २०० मेसेज मोफत मिळणार आहेत. या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे. हा ९७ रुपयांचा प्रीपेड प्लॅन देशभरात उपलब्ध आहे. कंपनीच्या आधीच्या ९९ रुपयांच्या प्लॅनला हा प्लॅन पर्याय असेल. यामध्ये २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, २ जीबी डेटा आणि १०० मेसेज मोफत मिळत होते.

मुख्यत: सध्या सर्वांशी जोरदार टक्कर देत असलेल्या रिलायन्स जिओच्या ९८ रुपयांच्या प्लॅनला हा प्लॅन टक्कर देणार आहे. यामध्ये २ जीबी डेटा, अनलिमिटेड मोफत कॉलिंग आणि ३०० मेसेजची सुविधा मिळते. याची व्हॅलि़डीटीही २८ दिवसांचीच होती. एअरटेलच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच My Airtel अॅपवर या रिचार्जचा फायदा घेता येणार आहे. याआधी कंपनीने आणखी स्वस्तातील ३५, ६५, ९५ रुपयांचे प्लॅन लाँच केले होते. हे प्लॅन्सही जिओला टक्कर देण्यासाठी आणले होते.