एअरटेलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आणखी एक दमदार प्लॅन आणला आहे. एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांसाठी हा प्लॅन आहे. ५९७ रुपयांच्या या प्लॅनमध्ये १६८ दिवस म्हणजे पाच महिन्यांहून जास्त इतकी वैधता आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना १० जीबी हायस्पीड इंटरनेट डेटा देण्यात येत असून १६८ दिवस या डेटाची वैधता असेल. सध्या हा प्लॅन काही ठरावीक सर्कलमध्ये लागू करण्यात आलाय, पण येत्या काही दिवसांमध्ये हा प्लॅन सर्व सर्कलमध्ये लागू केला जाणार आहे.

१० जीबी हायस्पीड इंटरनेटची मर्यादा संपल्यानंतरही इंटरनेट अमर्यादित कालावधीसाठी सुरूच राहणार आहे. मात्र मर्यादा संपल्यानंतर १२८ kbps या स्पीडने ग्राहकांना इंटरनेट वापरता येणार आहे. या प्लॅनमध्ये एअरटेलच्या सर्व अॅप्सचं सबस्क्रिप्श मोफत करता येईल, तसंच रोमिंगमध्येही अमर्यादित कॉलिंग, रोजच्या वापरासाठी १०० एसएमएस देण्यात येतील.

यापूर्वी एअरटेलने आपल्या ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केला होता. आता एअरटेलच्या ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २ जीबी हायस्पीड इंटरनेट डेटा दिला जातोय. तसंच अमर्यादित कॉलिंगचीही सुविधा दिली जात आहे. २८ दिवस या प्लॅनची वैधता आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये २ हजार ८०० एसएमएस दिले जात आहेत. एअरटेलने हा प्लॅन जिओच्या ९८ रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी आणला आहे.