टेलिकॉम कंपनी एअरटेलच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज आहे. कारण कंपनी आपल्या ग्राहकांना मोफत 1 जीबी 4G डेटा देत आहे. एका स्पेशल रिचार्ज प्लॅनच्या रिचार्जवर कंपनीकडून हा अतिरिक्त फ्री डेटा दिला जात आहे. पण हा मोफत डेटा कंपनी काही निवडक ग्राहकांनाच देत आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओनेही आपल्या प्रीपेड सब्स्क्राइबर्ससाठी अशीच ऑफर आणली होती. त्यामध्ये निवडक जिओ युजर्सना चार दिवसांसाठी 2 जीबी मोफत डेटा दिला जात होता.

एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांनी 48 रुपयांच्या डेटा पॅकने रिचार्ज केल्यास त्यांना एकूण 4 जीबी डेटा मिळत आहे. या डेटा पॅकमध्ये सामान्यपणे कंपनीकडून 3 जीबी डेटा मिळतो. पण, ऑफरनुसार काही निवडक ग्राहकांना 1 जीबी अतिरिक्त डेटा मिळतोय. ऑफर लागू झालेल्यांना रिचार्जनंतर कंपनीकडून मेसेजद्वारे माहिती दिली जात आहे. तीन दिवसांच्या वैधतेसह हा फ्री डेटा ग्राहकांना दिला जात आहे. OnlyTech फोरमचे मेंबर डीजे रॉय यांनी एअरटेलच्या या ऑफरची माहिती सर्वप्रथम दिली. याशिवाय कंपनीच्या 49 रुपयांच्या स्मार्ट रिचार्ज पॅकवरही 1 जीबी फ्री डेटा ट्रायल बेसिसवर दिला जात असल्याचं सांगितलं जात आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 एमबी डेटा आणि 38.52 रुपयांचा टॉक-टाइम मिळतो. पण, यासोबतच काही निवडक ग्राहकांना तीन दिवसांच्या वैधतेसह 1 जीबी फ्री डेटा दिला जात आहे.

ही फ्री डेटाची ऑफर रँडम युजर्ससाठी आहे, त्यामुळे सर्व एअरटेल युजर्सना याचा फायदा मिळणार नाही. काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओनेही 2 जीबी फ्री डेटाची ऑफर आणली होती. यामध्ये काही निवडक जिओ युजर्सना चार दिवसांसाठी एकूण 2 जीबी डेटा मोफत देण्यात आला होता.