रिलायन्स जिओने बाजारात मोफत इंटरनेटची सुविधा आणल्यापासून टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. एअरटेल कंपनीही मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभागी झाल्याचे म्हणता येईल. कारण नुकताच एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी इन्फीनिटी पोस्टपेड प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना ५० जीबी डेटा मोफत मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड मोफत कॉलिंगही मिळणार आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त इंटरनेट सुविधा मिळावी यासाठी एअरटेलने ही ऑफर लाँच केली आहे. त्याशिवाय रोमिंग कॉलही मोफत देण्यात आले आहेत.

हा प्लॅन जुन्या आणि नवीन दोन्ही ग्राहकांसाठी असेल असे एअरटेलने स्पष्ट केले आहे. या प्लॅनची किंमत ९९९ इतकी असेल, असे ‘गॅजेट ३६०’ ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. याशिवाय, ग्राहकांना सहा महिन्यांसाठी मोफत सुविधा देण्यात येणार आहे. ही सुविधा केवळ पोस्टपेड ग्राहकांसाठी असेल. या प्लॅनमध्ये दररोज किती इंटरनेट वापरायचे यावर बंधन नसेल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी २ महिने इतकी असेल. देशभरात मोफत कॉल्स, जिओच्या अॅप्सचे फ्री डाऊनलोडींग आणि मोफत मेसेज तसेच रोमिंग अशा सुविधा देत कंपनीने ग्राहकांना खूश केले आहे.

एअरटेलने नुकत्याच जाहीर केलेल्या ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी ८४ जीबी इंटरनेट डेटा ३ जी आणि ४ जी स्पीडने वापरता येणार आहे. म्हणजेच ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा वापरता येणार आहे. याशिवाय, कंपनीने मागील महिन्यातच आपला ९९९ रुपयांचा प्लॅन बाजारात आणला होता. यामध्ये ग्राहकांना दररोज ४ जीबी इंटरनेट डेटा मोफत मिळत होता. ज्या ग्राहकांना विविध कामांसाठी जास्त इंटरनेट वापरण्याची आवश्यकता असते अशांना हे प्लॅन उपयुक्त ठरु शकतात, असे कंपनीचे म्हणणे आहे. याशिवायही कंपनीने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी विविध प्लॅन्स याआधीही जाहीर केले होते.