रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजवली असतानाच आता जिओला टक्कर देण्यासाठी स्पर्धक कंपन्यांनीही आपले नवनवीन प्लॅन जाहीर केले आहेत. यामध्ये एअरटेलनेही आपले अनोखे प्लॅन्स लाँच करण्यास सुरुवात केली आहे. सध्या इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच विचार करुन कंपन्या इंटरनेटचे विविध प्लॅन आपल्या ग्राहकांना देत आहेत. नुकताच एअरटेलने ७९९ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी रोज ३.५ जीबी म्हणजेच एकूण ९८ जीबी डेटा मिळणार आहे. त्यामुळे एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांना या नव्या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे.

सध्या हा ७९९ रुपयांचा नवीन प्लॅन दिल्ली, आसाम, चेन्नई, मुंबई, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी याठिकाणच्या ग्राहकांना मिळू शकेल. या प्लॅनमध्ये इंटरनेटशिवाय ग्राहकांना २५० लोकल आणि एसटीडी कॉल्स मिळणार आहेत. त्याबरोबरच १०० मेसेजेसही मोफत मिळतील. त्यामुळे एअरटेलची ही अनोखी ऑफर ग्राहकांना नक्कीच आकर्षित करेल अशी कंपनीला आशा आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला १९९चा प्लॅन जाहीर केल्यानंतर नव्याने एअरटेलचे ग्राहक होणाऱ्यांसाठी कंपनीने १७८ आणि १७९ रुपयांचे दोन नवीन प्लॅनही बाजारात आणले आहेत.

याशिवायही कंपनीने आपले अनेक नवीन प्लॅन लाँच केले आहेत. एअरटेलने लॉंन्च केलेल्या प्लॅनपैकी सर्वात लहान प्लॅन केवळ ८ रूपयांचा आहे. तर, ३९९चा प्लान हा सर्वात महाग प्लान आहे. मात्र हे सर्व प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आहेत. ८ रूपयांच्या छोट्या प्लॅनमध्ये तुम्हाला ५६ दिवसांची वैधता मिळते. तसेच, सर्व लोकल आणि एसटीडी कॉल ३० पैसे प्रतिमिनिट दराने करता येणार आहेत. याशिवाय ४० रूपयांच्या प्लॅनमध्ये ३५ रूपयांचा टॉकटाईम दिला जातो. जो अनलिमिटेड काळासाठी वैध आहे. ६० रूपयांतही अनलिमिटेड वैधता असलेला एक प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ५८ रूपये इतका टॉकटाईम मिळतो.