बिहार सरकारने दोन वर्षांपूर्वी राज्य दारूबंदी केल्यानंतर आता खैनीवर (प्रक्रिया न केलेली तंबाखू) बंदीचा विचार सुरू आहे. याबाबत बिहार सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरणाला (एफएसएसएआय) खैनीचा बंदी असलेल्या पदार्थाचा समावेश करण्यासाठी निर्देश देण्याची मागणी केली आहे.

बिहारमध्ये पानमसाला, गुटखा यावर यापूर्वीच बंदी आहे. बिहारमध्ये गेल्या एक दशकात तंबाखू सेवन कमी झाले आहे. मात्र खैनीचा वापर वाढणे ही चिंतेची बाब आहे, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका सर्वेक्षणानुसार एकूण लोकसंख्येचा २० टक्के खैनीचे सेवन करतात. त्यामुळे तोंडाच्या कर्करोगासारखे गंभीर आजार होतात, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

खैनीवर बंदी आणण्याच्या प्रस्तावावर काही विरोधी नेत्यांनी टीका केली आहे. सरकारची अकार्यक्षमता लपविण्यासाठी नितीशकुमार यांची ही धडपड आहे, खरेच खैनीवर बंदी आणण्याचे धाडस त्यांच्यामध्ये आहे काय? असा सवाल हिंदुस्थान अवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनी केला आहे. या उद्योगात मोठय़ा प्रमाणात लोक अवलंबून आहेत त्यांच्या उपजीविकेचे काय, असा सवाल त्यांनी केला आहे.

अर्थात बिहार सरकारने दारूबंदी केल्यानंतर या व्यवसायात उत्पादन व विक्रीवर अवलंबून असलेल्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी अनेक योजना आणल्या आहेत. सरकारी यंत्रणेतील व्यक्तींकडूनच दारूबंदी कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी पावले उचलली जातील, असे गेल्याच आठवडय़ात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.