व्यसन मग ते कोणतेही असो ते वाईटच. यातही दारुचे व्यसन सर्वात वाईट. एकदा हे व्यसन लागले की ते सुटणे अवघडच. या व्यसनाचा शरीरावर होणारा परिणाम आणि त्यामुळे उद्भवणारे आजार आपल्याला माहित आहेत. पण या आजारांमुळे भारतात अनेकांचा मृत्यू होतो. हे प्रमाण धक्कादायक असल्याचे नुकतेच समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशात वर्षाला दारुमुळे २.६ लाख जणांचा मृत्यू होतो. या लोकांना यकृताच्या समस्या, कर्करोग यांसारख्या समस्या उद्भवतात. तसेच दारु पिऊन गाडी चालवल्यानेही बरेच अपघात होतात आणि त्यातच अनेकांचा मृत्यू होतो.

तंबाखूच्या संदर्भात ज्याप्रमाणे धोरण असते त्याचप्रमाणे दारुच्या विषयातही राष्ट्रीय धोरण असावे अशी मागणी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. देशभरात दारु पिण्यासाठी वयाची एकच अट असावी असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या महाराष्ट्रात हे वय २५ वर्षे असून गोव्यात ते १८ वर्षे आहे. मात्र बे सगळीकडे सारखेच असावे अशी मागणी होत आहे. यासाठी केंद्रिय स्तरावर एकच कायदा अस्तित्वात आणायला हवा असे म्हटले जात आहे. जगात दिवसाला दारुमुळे ६ हजार जण मृत्युमुखी पडतात. यातील २८ टक्के अपघात हे वाहनांचे अपघात, स्वत:ला इजा करुन घेणे आणि हिंसा यामुळेच होतात. तर २१ टक्के पचनाच्या तक्रारीमुळे होतात. १९ टक्के लोकांना हृदयाशी संबंधित तक्रारी उद्भवतात. तर बाकीच्यांना कर्करोग आणि इतर तक्रारी उद्भवतात.

भारतात वर्षाला होणाऱ्या एकूण अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी १ लाख लोकांचे मृत्यू हे अप्रत्यक्षरित्या दारुमुळे होतात. तर कर्करोगामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ३० हजार जण दारु घेत असल्याचे समोर आले आहे. तर यकृताच्या आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असून त्यामुळे १.४ लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे तरुणांना या व्यसनापासून दूर ठेवणे हे येत्या काळातील मोठे आव्हान असेल.