मित्रांच्या हट्टामुळे ‘मद्याचा एकच प्याला’ घेणे तरुणांसाठी धोकादायक ठरू शकते. १३ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांनी मद्य रिचवल्यामुळे त्यांच्या मेंदूक्षमतेवर परिणाम होत असून मेंदूची स्मृतिक्षमता, भाषा शिकण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. मद्यपान करण्याचे अनेक दुष्परिणाम पुढील आयुष्यात दिसून येतात, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

मद्यपान करणे ही जगभरातील लोकांची अतिशय जुनी सवय आहे. मात्र खासकरून ज्या वेळी अतिप्रमाणात मद्यपान केले जाते, त्या वेळी त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

विशेषत: पौगंडावस्थेत असणारी मुले मजा म्हणून मद्यपान करतात. या वेळी ते संपूर्ण रात्र रात्र मद्यपान करीत बसतात. मात्र त्या वेळी ते मद्यपानामुळे आरोग्यावर काय परिणाम होतो, याचा विचार करीत नाहीत.मद्यपान करण्याचे प्रमाण महाविद्यालयीन युवकांमध्ये जास्त आहे. अमेरिकेत महाविद्यालयीन तरुणांमध्ये मद्यपान करणे सामान्य बाब असून, २५ टक्के तरुण सलग तीस दिवसांपेक्षा जास्त दिवस सातत्याने अतिप्रमाणात मद्यपान करीत होते, असे अमेरिकेच्या एका अहवालामध्ये आढळून आले आहे.

पौगंडावस्थेत असणाऱ्या मुलांच्या मेंदूचा विकास पूर्णपणे झालेला नसतो. त्यामध्ये म्हणावी तितकी परिपक्वता आलेली नसते. तसेच मानसिक वागणुकीमध्ये म्हणावा तितका बदल झालेला नसतो, असे अमेरिकेच्या ओरेगॉन स्टेट विद्यापीठाच्या प्राध्यापक अनिता सीसेर्वेका यांनी म्हटले आहे. अतिप्रमाणात मद्यपान करण्यामुळे मज्जासंस्थेच्या विकासावर परिणाम होत असून, मेंदूच्या नैसर्गिक वाढीला अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. अतिमद्यपान करण्यामुळे एखाद्या गोष्टीस प्रतिसाद न देणे, स्मरणशक्ती, शब्द लक्षात ठेवणे, निर्णयक्षमता यावर परिणाम होत असल्याचे, अभ्यासामध्ये आढळून आले आहे.