रेडिओवर गाणी ऐकण्यात जी मजा आहे त्याची इतर कोणत्याही गोष्टीशी तुलना होऊ शकत नाही. मागच्या काही काळात तंत्रज्ञानात झालेल्या बदलामुळे रेडिओ काहीसा मागे पडला आणि सीडी, मोबाईल आणि आता ब्लूटूथच्या माध्यमातून गाणी ऐकणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली. पण संगीतप्रेमींनी पुन्हा एकदा रेडिओकडे वळविण्याच्या दृष्टीने ऑल इंडिया रेडिओने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यासाठी ऑल इंडिया रेडिओने अॅमेझॉनसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता अॅमेझॉन एको डिव्हाईसवरही ऑल इंडिया रेडिओचे सगळे चॅनल्स ऐकता येतील.

अॅमेझॉन एको हे आर्टीफिशियल इंटेलिजन्स एक असे उपकरण आहे जे व्हॉईस कमांडवर काम करते. ऑल इंडिया रेडिओचे डिरेक्टर जनरल एफ.सहरयार यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही बदलत्या काळानुसार बदलत आहोत. काही दिवसांपूर्वी अॅमेझॉनसोबत हा करार झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. या सेवेमध्ये एफ गोल्ड, एफ रेनबो, विविध भारतीसारखी १७ स्थानिक चॅनेल्स चालू शकतील. हा रेडिओ १५ क्षेत्रीय भाषांमध्ये काम करेल. याशिवाय ऑल इंडिया रेडिओच्या आणखी काही सुविधा अॅमेझॉन एकोवर मिळणार आहेत.