ख्यातनाम कार निर्माती कंपनी Maruti Suzuki ने भारतीय बाजारात आपल्या नव्या Ertiga एमपीव्हीचं(मल्टी पर्पज व्हेइकल) नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच केलं आहे. आज (बुधवारी) कंपनीने ही कार लाँच केली. मारुती सुझुकी एरेना डिलरशीप नेटवर्कद्वारेच या कारची विक्री होणार आहे. अवघ्या 11 हजार रुपयांमध्ये या कारसाठी नोंदणी सुरू आहे. 7 लाख 44 हजारांपासून पुढे या कारची किंमत ठेवण्यात आली आहे. नव्या कारचं डिझाइन आकर्षक आहे. जाणून घेऊया या कारची किंमत आणि खासियत –

पेट्रोल(1.5 लिटर) आणि डिझेल(1.3 लिटर) अशा दोन्ही व्हेरिअंट्समध्ये ही कार उपलब्ध असणार आहे. पेट्रोल व्हेरिअंटमध्ये 1,500cc चं इंजिन आहे. याद्वारे 105hp पावर आणि 138Nm पिक टॉर्क जनरेट होईल. नव्या Ertiga ची 4,395mm इतकी लांबी, 1,735mm रुंदी आणि 1,690mm उंची असेल, तर 2,740mm व्हिल बेस असणार आहे. पेट्रोल व्हेरिअंटमध्ये ड्युअल-बॅटरी सेटअप असेल. तर डिझेल व्हेरिअंटमध्ये जुन्या मॉडेलप्रमाणेच सिंगल बॅटरी सेटअप असणार आहे.

ऑबर्न रेड, मॅग्मा ग्रे, ऑक्सफोर्ड ब्ल्यू , आर्कटिक व्हाइट आणि सिल्की सिल्वर अशा पाच रंगांमध्ये ही कार उपलब्ध असेल. Ertiga चं हे नवं मॉडेल कंपनीच्या सर्व डिलर्सकडे उपलब्ध झाल्यानंतर सध्या बाजारात असलेल्या मॉडेलचं उत्पादन पूर्णतः थांबवण्यात येणार आहे. नवं मॉडेल लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेलचं नाव बदललं जाईल अशी शक्यता आधी वर्तवली जात होती, मात्र नवं मॉडेल लाँच झाल्यानंतर सध्या बाजारात असलेल्या मॉडेलचं उत्पादन पूर्णतः थांबवण्यात येणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

मारुती सुझुकीने एप्रिल 2012 मध्ये Ertiga चं सध्या बाजारात असलेलं मॉडेल लाँच केलं होतं. त्यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये या मॉडेलचं मिड-सायकल अपडेट आणलं होतं. 2012 मध्ये लाँचिंग झाल्यापासून आतापर्यंत कंपनीने जवळपास 4.2 लाख युनिट्सची विक्री केली आहे. सध्याचं मॉडेल 1.4-लिटर पेट्रोल आणि 1.3-लिटर डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.