नियमित आहारामध्ये बदामांचा समावेश केल्यास हृदय आणि रक्तवाहिन्यांचा धोका कमी होण्यास मदत होते, असे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात आढळून आले आहे. युरोपियन नागरिकांच्या तुलनेत भारतातील हृदयरुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे, असेही या संशोधनात आढळले आहे.

पोषणआहार आणि हृदयरोगासंबंधातील भारतीय तज्ज्ञांनी केलेले हे संशोधन ‘न्यूट्रिएन्ट्स’ या मासिकात नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. दैनंदिन आहारात बदामांचा समावेश केल्याने भारतीयांमधील हृदयरोगासाठी कारणीभूत असलेल्या डिस्लेपिडीमियाचे प्रमाण घटण्यास मदत होते. डिस्लेपिडीमिया हे एलडीएल कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लायसेराईड यांचे अतिप्रमाण आणि एचडीएल कोलेस्टेरॉलचे कमी प्रमाण असलेला घटक आहे.

नियमित आहारामध्ये ४५ ग्रॅम बदामांचा समावेश केल्यास त्यामुळे डिस्लेपिडीमिया कमी करण्यास मदत होते, असे या संशोधनाचे प्रमुख सौमिक कलिता यांनी सांगितले. हानीकारक एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी विशिष्ट आहार ठरविला जातो. या आहारामुळे लाभदायी एचडीएल कोलेस्टेरॉलही कमी होते. मात्र, बदाम सेवनाने लाभदायी कोलेस्टेरॉलची हानी होत नाही, असे कलिता यांनी सांगितले. १,६९७ मासिकांनी हृदयासाठी बदाम सेवन कितपत लाभदायी आहे, याचे विश्लेषण केले आहे. या संशोधनात आहारात बदामाचा समावेश केलेल्या भारतीयांचाही अभ्यास मांडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आहारात बदामाचा समावेश केल्याने हृदयरोगापासून दूर राहण्यास कशा प्रकारे मदत होते, असेही त्यात मांडण्यात आले आहे. भारतामध्ये हृदयविकारामुळे २८ टक्के मृत्यू होतात. त्यामुळेच इतर आजारांपेक्षा हृदयरोगाचा धोका अधिक आहे. एलडीएल कोलेस्टेरॉलमुळे भारतीयांना हृदयरोगाचा धोका इतरांपेक्षा अधिक असल्याचे कलिता यांनी सांगितले.