भारतीय वंशाच्या एका अमेरिकी शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली अल्झायमरवरील लसीची चाचणी घेतली जात आहे. अल्झायमर हा मेंदूतील चेतापेशींची हानी, नाश घडविणारा रोग आहे. हा रोग झालेल्या रुग्णांच्या मेंदूमध्ये दिसून येणाऱ्या एका विशिष्ट प्रथिनाला लक्ष्य करून हा रोग टाळता येऊ शकेल, या गृहीतकावर आधारित अशी ही लस आहे.

अल्झायमर हा रोग वरचेवर वाढत जाणारा आहे. यात मेंदूतील पेशींची हानी होत जाते आणि अखेरीस त्या पेशी नष्ट होतात. मानवामध्ये कायमच्या मानसिक ऱ्हासाच्या व्याधीला बहुतांश अल्झायमर हाच कारणीभूत ठरतो. मानसिक ऱ्हासाच्या (डीमेंशिया) या व्याधीत विचारशक्ती कमी होत जाणे, वर्तणुकीची आणि सामाजिक कौशल्ये कमी होत जाणे, स्वतंत्रपणे कार्य करण्याची माणसाची क्षमता नष्ट होणे आदी समस्या उद्भवतात.

अल्झायमरला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी सध्या न्यू मेक्सिको विद्यापीठातील संशोधक घेत आहेत. त्यांचे नेतृत्व तेथील रेणूय अनुवंशशास्त्र आणि सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. किरण भास्कर हे करीत आहेत. ही चाचणी उंदरांवर केली जात आहे. ही लस माणसावरील उपचारांसाठी कामी येऊ शकेल काय, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, असे वृत्त ‘सीबीएस न्यूज’ने दिले आहे. डॉ. भास्कर हे गेल्या दशकभरापासून या विषयावर संशोधन करीत आहेत. लसीची संकल्पना २०१३ पासून पडताळून पाहिली जात आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘अल्झायमरवरील लसीची संकल्पना सुचल्यानंतर ती तयार करण्यासाठी सुमारे पाच वर्षे लागली.’