अल्झायमर्स रोगाचे लवकर निदान करण्यासाठी संशोधकांनी एक रक्त चाचणी विकसित केली आहे. ही रक्तचाचणी ९० टक्के प्रभावी असून रुग्णामध्ये अल्झायमर्स विकसित होण्याचा धोका आहे की नाही याची माहिती देते. सद्य:स्थितीत या रक्तचाचणीचा वापर केवळ संशोधनासाठीच केला जात आहे. यामध्ये मेंदूतील ठरावीक अमिनो आम्लांचे मोजमाप होते.  यामुळे रुग्ण अल्झायमर्स आजाराच्या सुरुवातीच्या अवस्थेत आहे का नाही याची माहिती मिळते. ही रक्तचाचणी जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी विकसित आणि मान्य केली आहे. यामुळे अल्झायमर्सच्या औषध चाचण्यांचा वेग वाढविता येऊ शकतो. पहिल्या टप्प्यात ही चाचणी संभाव्य रुग्णांवर औषध चाचणी करण्यासाठी मोलाची ठरू शकते, असे मेलबर्न विद्यापीठाचे प्राध्यापक कॉलिन मास्टर्स यांनी सांगितले. हा अभ्यास नेचर नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. अल्झायमर्स रोगावर उपचारात्मक धोरणे विकसित करण्याचा वेग निराशाजनकरीत्या मंद असल्याचे संशोधकांनी सांगितले. या आजारासाठी सद्य:स्थितीत बाजारात असलेली औषधे रोगावर उपचार करण्यास असमर्थ असून, नवी औषधे अत्यावश्यक असून यासाठी या प्रक्रियेला गती देण्याची आवश्यकता असल्याचे संशोधकांनी म्हटले. यासाठी रुग्णांच्या निवड चाचण्यांसाठी लक्ष देणे गरजेचे आहे. असे केल्याने अल्झामयर्स आजार नसणाऱ्या रुग्णांना या चाचण्यांमधून टाळता येईल. चाचण्यांचा कालावधी मोठा असल्याने कोणत्या रुग्णांना अल्झायमर्सचा धोका आहे याचा अचूक अंदाज औषधनिर्माण करणाऱ्या कंपन्यांना असणे आवश्यक आहे. अल्झायमर्स आजारात मेंदूमध्ये अस्वाभाविक बेटा अ‍ॅमाइलॉइड ही अमिनो आम्ले तयार होतात. ही प्रक्रिया अत्यंत हळू असून स्मृतिभ्रंशाचे कोणतेही लक्षण दिसण्यासाठी ३० वर्षांचा कालावधी लागतो.