सध्याच्या काळात पाहायला गेलं, तर अनेक जण वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. या तरुणवर्गाचा सर्वाधिक समावेश असल्याचं पाहायला मिळतं. बदलती जीवनशैली आणि त्यानुसार दररोज केलं जाणारं फास्टफूडचं सेवन यामुळे शरीराचं वजन, चरबी यांची झपाट्याने वाढ होते. मग हे वाढतं वजन कमी करण्यासाठी अनेक जण जीम, व्यायाम, डाएट याचा आधार घेतात. मात्र तरीदेखील वजन कमी करण्यात अडथळे येतात. अशामध्ये काही घरगुती पदार्थांच्या मदतीने वजन कमी करण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

१. चियाच्या बिया-
वजन कमी करण्यासाठी अनेक जण चियाच्या बियांना प्राधान्य देतात. या बियांमध्ये शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्याची क्षमता असते. तसंच य बियांमुळे भूक नियंत्रणात राहते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने चियाच्या बियांचं सेवन करा.

२. जवस किंवा अळशीच्या बिया –
काळ्या रंगाच्या लहान-लहान दिसणाऱ्या अळशीच्या बिया या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. वजन कमी करण्यासोबतच या बियांमुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं. इतकंच नाही तर कर्करोगाचा धोकाही कमी असतो. अनेकांच्या घरात अळशीच्या बियांची चटणी केली जाते. त्यामुळे आहारात जर अळशीच्या बियांचा समावेश असेल तर अनेक रोगांपासून दूर राहण्यास मदत होते.

३. सब्जा-
उन्हाळा आला की अनेकांच्या घरात सब्जा दिसून येतो. शरीराला थंडावा देणाऱ्या सब्जामध्ये अनेक गुणधर्म आहेत. यात ओमेगा-३ फॅटी अॅसिडचं प्रमाण असतं. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते. शरीरातील अन्नपचन सुरळीत होतं. त्यामुळे शक्य होईल त्याप्रमाणे पाण्यासोबत सब्जाचे सेवन करावे. मात्र सब्जाचे सेवन करण्यापूर्वी तो पाण्यात भिजवून ठेवावा लागतो.