इ-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनला अखेर स्वतःच्या नावाचं म्हणजेच “. amazon” हे डोमेन मिळालं आहे. इंटरनेटवरील संकेतस्थळांची नावं आणि नंबरवर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘आयसीएएनएन’कडून(ICANN – Internet Corporation for Assigned Names and Numbers) यासाठी अॅमेझॉनला परवानगी मिळाली आहे. अनेक वर्षांपासून अॅमेझॉनकडून या डोमेनची मागणी करण्यात आली होती. मात्र, लॅटिन अमेरिकेतील काही देशांनी याला विरोध केला होता.

2012 मध्ये अॅमेझॉनने या डोमेनसाठी अर्ज केला होता. मात्र, ब्राझिल आणि अन्य काही देशांनी “. amazon” या डोमेनसाठी विरोध केला. जगप्रसिद्ध अॅमेझॉन जंगलाशी या डोमेनचं नाव मिळतं जुळतं आहे. हे नाव आमच्या भौगोलिक प्रदेशाशी संबंधित आहे. त्यामुळे “. amazon” या डोमेनवर कोणाचीही मक्तेदारी नसावी, अशी मागणी या देशांनी ICANN कडे केली होती.

अॅमेझॉनचं जंगल आणि अॅमेझॉनिया परिसरातील सांस्कृतिक वारसा जपला जाईल. त्यासाठी या परिसराशी संबंधित जवळपास 1500 संवेदनशील नावं ब्लॉक केली जातील, अटींची योग्य पूर्तता होतेय की नाही यावर देखरेखीसाठी संयुक्त सल्लागार समितीची स्थापना करण्यात येईल, अशा अटींवर ICANN ने मान्यता दिली आहे. यापूर्वी दोन्ही पक्षांना सामंजस्याने विचार करुन उपाय सुचविण्यास सांगण्यात आलं होतं, पण तरीही मार्ग निघाला नाही. त्यातच अॅमेझॉनने नव्याने स्वतःची बाजू मांडण्यासाठी सांगितलेल्या मुद्द्यांबाबत खात्री पटल्यामुळे अॅमेझॉनच्या बाजूने निर्णय देण्यात आल्याचंही ICANN ने स्पष्ट केलं.

दुसरीकडे या निर्णयानंतर ब्राझिलने नाराजी व्यक्त केली आहे. ICANN ने जनतेच्या भावनांचा विचार केला नाही, या निर्णयामुळे आम्ही दुःखी आहोत अशी प्रतिक्रिया ब्राझिलच्या वनमंत्रालयाने दिली आहे. परिणामी . amazon या डोमेनसाठी ब्राझिलचा विरोध अद्यापही कायम असल्याचं स्पष्ट आहे.