Amazon ने आपल्या भारतातील ग्राहकांसाठी एक खुशखबर आणली आहे. आता अॅमेझॉनच्या भारतीय ग्राहकांना त्यांच्या अॅपच्या माध्यमातून देशांतर्गत विमानांचे तिकीट आरक्षित करता येणार आहे. याव्यतिरिक्त शॉपिंग, पैसे ट्रान्सफर करणे, बिल पेमेंट, मोबाइल रिचार्जही ‘अॅमेझॉन पे’च्या अॅपच्या सहाय्याने करता येतील. अॅमेझॉनने नुकतीच याबाबत माहिती दिली.

ऑनलाईन ट्रॅव्हल पार्टनर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म क्लिअरट्रिपच्या माध्यमातून अॅमेझॉनने विमानांच्या तिकीटांच्या आरक्षणाची सुविधा सुरू केली आहे. आम्ही क्लिअरट्रिपबरोबर भागीदारी करून खुश आहोत. तसेच ग्राहकांना मिळणारा अनुभवही उत्तम असेल, असे मत ‘अॅमेझॉन पे’चे संचालक शारिक प्लास्टीकवाला यांनी व्यक्त केले.

दरम्यान, प्रवाशांनी आरक्षित केलेले तिकीट रद्द केल्यास अॅमेझॉन कोणतेही शुल्क आकारणार नाही. प्रवाशांकडून केवळ कॅन्सलेशन पेनल्टी आकारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यापुढेही ‘अॅमेझॉन पे’च्या माध्यमातून ग्राहकांच्या सोयीच्या अनेक नव्या सुविधा सुरू करणार आहोत. तसेच मेंबरशिपच्या माध्यमातूनही ग्राहकांना अधिक फायदा मिळवून देण्यावर आमचा भर असेल, असेही प्लास्टीकवाला यांनी नमूद केले.