झपाट्याने विस्तारत असलेल्या फूड डिलिव्हरी क्षेत्रात आता अ‍ॅमेझॉनही उडी घेणार आहे. तशी तयारी अ‍ॅमेझॉनने सुरू केली असून, त्यामुळे झोमॅटो, स्विगी, उबर ईट्ससह फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांसमोर तगडं आव्हान उभे राहणार आहे.

भारतात मध्यमवर्गीयांचा कल आॅनलाइन फूड मागविण्याकडे वाढला असून, त्यामुळे आॅनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्र प्रचंड वाढले आहे. २०१८ मध्ये आॅनलाइन आॅर्डरचा आकडा १७८ टक्क्याने वाढल्याचे पाहणीतून समोर आले आहे. त्यामुळे आता अ‍ॅमेझॉनही या क्षेत्राकडे वळली आहे. यासाठी प्रसिद्ध आयटी उद्योजक नारायण मूर्ती यांनी स्थापन केलेल्या कॅटमरन या भारतीय कंपनीशी भागीदारी करणार आहे.

या सेवेसाठी अ‍ॅमेझॉनने कर्मचाऱ्यांची भरतीही सुरू केली असून, कंपनीचे नाव गोपनिय ठेवण्यात आले आहे. अ‍ॅमेझॉन ही सेवा सणांच्या काळात अर्थात १ सप्टेंबरपासून सुरू करणार आहे. यामाध्यमातून कंपनीच्या अन्य सेवांकडे ग्राहकांना वळविण्याचाही कंपनीचा प्रयत्न असणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. असे असले तरी अ‍ॅमेझॉनच्या आगमनानंतर झोमॅटो, स्विग्गीला मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

दुसरीकडे नव्या सेवेसाठी अ‍ॅमेझॉनने उबर ईट्स घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे वृत्त बिझनेस स्टॅण्डर्सने दिले आहे. वाढत्या स्पर्धेमुळे अ‍ॅमेझॉनने गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील फूड डिलिव्हरी सेवा बंद केली आहे. वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांनी भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सुविधांची घोषणा केली आहे. या कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासह भारतीय बाजारपेठे पाय रोवण्याचा प्रयत्न अ‍ॅमेझॉनकडून सुरू आहे.