2015 पर्यंत ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील 10 अब्ज डॉलरच्या वस्तूंची अ‍ॅमेझॉन निर्यात करेल, अशी घोषणा ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांनी केली आहे. बेझॉस सध्या भारताच्या दौऱ्यावर असून बुधवारी दिल्लीत लघु उद्योजकांच्या परिषदेमध्ये त्यांनी याबाबत घोषणा केली. तसेच, छोट्या आणि मध्यम उद्योजकांना डिजिटल करण्यासाठी अ‍ॅमेझॉन भारतात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचंही त्यांनी जाहीर केलं.

भारतात लघु आणि मध्यम उद्योजकांना डिजिटल उपकरणांनी सुसज्ज करण्यासाठी अ‍ॅमेझॉन भारतात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल, असे बेझॉस यांनी जाहीर केले. तसेच, 2025 पर्यंत ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील 10 अब्ज डॉलरच्या वस्तूंची अ‍ॅमेझॉन निर्यात करेल, अशी घोषणाही बेझॉस यांनी केली. भारतात ई-कॉमर्सची बाजारपेठ झपाट्याने वाढली आहे. यातील वृद्धी आणि व्यावसायिक संधी लक्षात घेऊन अ‍ॅमेझॉन भारत एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. असे बेझॉस म्हणाले.

भारत दौऱ्यावर आलेल्या जेफ बेझॉस यांनी बुधवारी मकरसंक्रातीच्या दिवशी नवी दिल्लीत लहानग्यांसोबत पतंगबाजीचा मनमुराद आनंद लुटला. पतंग उडवतानाचा व्हिडीओही बेझॉस यांनी इंन्टाग्रामवर शेअर केलाय. यापूर्वी मंगळवारी भारतात दाखल झाल्यानंतर, बेझॉस यांनी राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यापूर्वी बेझॉस यांच्या भारत दौऱ्यात अ‍ॅमेझॉनकडून भारतात विस्ताराबाबत मोठ्या घोषणेची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आता केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी उपक्रम असलेल्या ‘मेक इन इंडिया’ला अ‍ॅमेझॉन या जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीचे पाठबळ मिळणार आहे.