वाचक लेखक
अमेरिकेच्या अर्कान्सस राज्यात एक हिऱ्यांची खाण आहे. तिथे दिवसाचे १० डॉलर्स प्रवेशमूल्य भरले की तिथे खणण्याचे, उकरण्याचे काम करून तुमच्या हाती एखादा हिरा, गेलाबाजार एखादी हिरकणी लागली तर ते तुम्ही विनाअट घेऊ शकता. कोणी अडवणार नाही. ही नशिबाला कौल लावण्याची सुवर्ण (हिरे) संधी आहे की नाही?

पृथ्वीच्या पोटात ९० ते १६० कि.मी. खोलीवर तप्त रस खदखदत असतो. अशा तापमानात दगडी कोळशाचे रूपांतर हिऱ्यात होऊ शकते. कधी हा तप्त रस पृथ्वीच्या बाहय़थराला भेदून बाहेर ज्वालामुखीच्या रूपाने प्रगट होतो. असाच एक ज्वालामुखी लाखो वर्षांपूर्वी उसळला होता. त्या अग्निरसातून काही हिरे आले. हा तप्त रस ८३ एकरातून बाहेर पसरला. त्यातून हिरे आले असतील अशी कल्पना खरे तर कोणालाच नव्हती. हा लाव्हा दीर्घ क्षेत्रावर पसरून कालांतराने थंड झाला.

हडलस्टोन त्याच्या जवळपास २४३ एकरावर शेती करीत होता. तो निरक्षर होता. १९०६ साली शेतात  खणत असता दोन चकचकीत पिवळ्या रंगाचे दगड त्याच्या हाती लागले. ते काय आहेत याची कल्पनाच त्याला नव्हती. एकाच्या ग्राइण्डिंग व्हीलवर ते घासून पाहत असता त्या व्हीलवर त्याची चकाकी उमटली. तेव्हा ते काय आहे हे तपासण्यासाठी रत्नपारख्याकडे नेण्यात आले. ते निघाले हिरे! एकाचे वजन २.५/८ कॅरट तर दुसऱ्याचे १.३/८ कॅरट. काही वर्षांपूर्वी ही शेतजमीन त्याने एक हजार डॉलर्स आणि एका तट्टाच्या बदल्यात खरेदी केली होती. ती खाणकाम करणाऱ्यांनी ३६ हजार डॉलर्सना विकत घेतली. हडलस्टोनला तेवढा फायदा खूप वाटला. खरेदीदारांनी त्या जागी हिऱ्यांची खाण सुरू केली. ती बातमी सर्वत्र पसरल्यावर तिकडे लोक येऊ लागले. त्यांच्या सोयीसाठी हॉटेले निघाली. काही दिवसांनी इतकी गर्दी होऊ लागली की हॉटेलात राहायला जागा मिळेना.

जे नशीबवान होते त्यांना हिरे सापडू लागले. १९९९ पर्यंत तिथे ४७१ हिरे सापडले. तिथे हिऱ्यांसाठी खोदकाम करायचे असेल तर टिकाव, पावडी, बादल्या स्वत:च्या आणाव्या लागतात किंवा तिथेच भाडय़ाने मिळू शकतात. तिथल्या केंद्रावर हिरे कसे शोधावेत याचे प्रात्यक्षिक दाखवणारे व्हिडीओ बघता येतात. एखाद्याला हिरा सापडला तर प्रमाणपत्र मिळते. साखळी लावलेले कुत्रे खाणीत नेता येतात. आतमध्ये उन्हात थांबण्यासाठी निवारे आहेत. तिथे शीतपेये मिळू शकतात. मात्र शोधकाम करण्यासाठी बॅटरीवर किंवा मोटारीवर चालणारी यंत्रे वापरता येत नाही. फ्लडलाट्टरसच्या वा धातुशोधक यंत्रांच्या उपयोगाला परवानगी नाही. तरीही कित्येक जण तिथे मुक्काम ठोकून अनेक दिवस नशिबाची परीक्षा घेतात. त्यांच्यापैकी एकाला सापडलेला १.०९ कॅरटचा हिरा अप्रतिम ठरला आहे. दुसऱ्या एका नशीबवान माणसाला ६.५३ कॅरट वजनाचा एस्परँझो हिरा २०१५ साली सापडला. त्याला पैलू पाडल्यावर त्यातून ४.६ कॅरटचा हिरा मिळाला, ज्याची किंमत पाच लाख डॉलर्स केली गेली होती.

या जागेची अनेकवार विक्री होत गेली. १९७२ साली सरकारने ती जागा साडेसात लाख डॉलर्सना विकत घेतली. त्यातील ९११ एकरावर ज्वालामुखी विवरातील जागेवर सरकारी उद्यान करून त्यातील ३७ एकर जागा जनतेला नशीब अजमावण्यासाठी खुली ठेवलेली आहे.

ज्या हडलस्टोनला तिथे पहिले दोन हिरे मिळाले होते व ज्यामुळे या जागेला मोठी किंमत मिळाली होती, त्याचे नशीब मात्र खडतर निघाले. त्याने हाती आलेला पैसा जिथे गुंतवला होता, तो बुडाला. तो विपन्नावस्थेत १९३६ मध्ये मरण पावला.

हल्ली पुष्कळ लोक अमेरिकेत पर्यटनासाठी जातात. त्यापैकी कोणाला नशीब अजमवायचे असेल तर त्याने तिकडे जाण्याचा विचार करावा. कोणी सांगावे, त्याला एखादा हिरा मिळूनही जाईल. मात्र परदेशी माणसाला तिथे नशीब अजमवायची संधी आहे की नाही हे तपासून जावे.
दिगंबर गाडगीळ – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा